ममता बॅनर्जी रडारवर? कालीघाट ऑफिसमध्ये CIDची धडक, नोटीस बजावली
मुंबई (प्रतिनिधी) : पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ता गमावल्यानंतर तृणमूल काँग्रेस आणि पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासमोरील अडचणी वाढत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांनंतर आता राज्याच्या तपास यंत्रणांच्याही रडारवर ममता बॅनर्जी आल्याचं दिसून येतंय. मंगळवारी सीआयडीचे एक विशेष पथक थेट कोलकाता येथील ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट कार्यालयात धडकले. यामुळे बंगालच्या राजकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सीआयडीचे हे पथक ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि पक्षाचे नेते अभिषेक बॅनर्जी यांना एका स्वाक्षरी फेरफार प्रकरणात कायदेशीर नोटीस बजावण्यासाठी तिथं पोहोचले होते. काही दिवसांपूर्वीच तपास यंत्रणेनं त्यांना चौकशीसाठी समन्स जारी केलं होतं. त्यावरून सध्या बंगालमध्ये भाजप आणि टीएमसी नेत्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगल्याचं दिसतंय.
दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि बिधाननगर महानगरपालिकेचे माजी महापौर सब्यसाची दत्ता यांना पोलिसांनी अटक केली आहे. सॉल्ट लेक परिसरातील एका नामांकित व्यवसायिकाकडून सुमारे 1.05 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
बिधाननगर उत्तर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा राजारहाट येथील त्यांच्या निवासस्थानावरून ही अटक केली. त्यानंतर मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, न्यायालयात घेऊन जात असताना संतप्त नागरिकांनी सब्यसाची दत्ता यांच्यावर अंडी आणि टोमॅटो फेकल्याची घटना घडली,. त्यामुळे पोलिसांची मोठी धावपळ उडाली. दत्ता यांनी मात्र हे सर्व आरोप राजकीय सूडबुद्धीने प्रेरित आणि खोटे असल्याचे म्हटलं आहे.




