दहावीच्या विद्यार्थिनीने तलावात उडी मारली; तरूण वाचवायला गेला पण...; दोघांचाही दुर्दैवी अंत, सिंधुदुर्गमधील घटना

दहावीच्या विद्यार्थिनीने तलावात उडी मारली; तरूण वाचवायला गेला पण...; दोघांचाही दुर्दैवी अंत, सिंधुदुर्गमधील घटना

मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध सावंतवाडी शहरातील मोती तलावात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने मोती तलावात उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, या तरुणीला बुडताना पाहून तिला वाचवण्यासाठी एका तरुणाने तात्काळ तलावाच्या पाण्यात उडी घेतली; परंतु दुर्दैवाने या प्रयत्नात त्या तरुणाचाही पाण्यात बुडून करुण अंत झाला आहे.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आत्महत्या करणारी विद्यार्थिनी लीशा गोसावी ही सावंतवाडीजवळील कारिवडे गावाची रहिवासी असून ती इयत्ता दहावीत शिकत होती. तर तिला वाचवण्यासाठी तलावात उडी घेणारा युवक रोहन गोसावी हा वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील रहिवासी होता. रोहन हा कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास होता. हे दोघेही एकमेकांचे जवळचे नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे.

घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिक आपत्कालीन पथक व पाणबुड्यांच्या मदतीने तलावात शोधकार्य सुरू करण्यात आले. शोधकार्यादरम्यान तरुणीला वाचवायला गेलेल्या रोहन गोसावी या तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. तर, विद्यार्थिनीचा मृतदेह शोधण्याचे काम तलावाच्या पात्रात युद्धपातळीवर सुरू आहे. दहावीत शिकणाऱ्या मुलीने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबतचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून सावंतवाडी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. एकाच वेळी दोन तरुण जीवांचा असा करुण अंत झाल्याने कारिवडे आणि नाधवडे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.