आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; वसईच्या समुद्रकिनारी हृदयस्पर्शी दृश्य

आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; वसईच्या समुद्रकिनारी हृदयस्पर्शी दृश्य

मुंबई (प्रतिनिधी) : वसईच्या समुद्रकिनाऱ्यावर एक भावनिक आणि हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळत आहे. आईपासून दूर झालेल्या एका व्हेल माशाच्या पिल्लाची समुद्रकिनाऱ्यावर सुरू असलेली धडपड पाहून अनेकांचे मन हेलावून गेले आहे. आईच्या शोधात हे पिल्लू वारंवार किनाऱ्यावर येत आहे. त्याला समुद्रात सोडलं जातंय, मात्र काही वेळातच ते पुन्हा किनाऱ्यावर परतत आहे. जणू समुद्राच्या अथांग पाण्यात हरवलेल्या आईला ते किनाऱ्यावरून शोधत असल्याचं हृदयस्पर्शी चित्र पाहायला मिळत आहे.

वसईच्या समुद्रकिनारी व्हेल माशाच्या पिल्लाची सुरू असलेली धडपड आणि आईच्या शोधासाठीची धावाधाव पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे. गेल्या काही तासांपासून हे पिल्लू वारंवार किनाऱ्यावर येत असल्याचं दिसून आलं आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेचे जीवरक्षक त्याला सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र, समुद्रात सोडल्यानंतर काही वेळातच ते पुन्हा किनाऱ्याकडे येत आहे.

स्थानिक मत्स्यव्यवसाय विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार, हे पिल्लू आईपासून विभक्त झालं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आईच्या शोधात ते पुन्हा पुन्हा किनाऱ्यावर येत असावं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या माय-लेकराची भेट पुन्हा घडावी, अशी प्रार्थनाही स्थानिकांकडून केली जात आहे.

मूक्या जीवाला आईपासून झालेली ताटातूट कदाचित कळत नसेल. मात्र, तिच्या शोधात सुरू असलेली त्याची धडपड मन हेलावून टाकणारी आहे. समुद्रात सोडल्यानंतर पुन्हा किनाऱ्यावर येण्यामागे आईचा शोध असावा, अशी भावना मत्स्यव्यवसाय विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाला देण्यात आली आहे. पिल्लाला सुरक्षितपणे खोल समुद्रात नेण्यासाठी मोठी बोट मागवण्यात येत आहे. या बोटीच्या मदतीने त्याला किनाऱ्यापासून दूर खोल समुद्रात सोडण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती रोहित घरत, कर्मचारी, मत्स्यव्यवसाय विभाग, वसई यांनी दिली.

कदाचित अथांग समुद्राच्या एखाद्या कोपऱ्यात त्याची आईही आपल्या पिल्लाचा शोध घेत असेल आणि या प्रयत्नांमुळे माय-लेकरांची पुन्हा भेट होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या पिल्लाला कोणतीही इजा होऊ नये, यासाठी जीवरक्षक आणि मत्स्यव्यवसाय विभागाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. आता या मुक्या जीवाला त्याची आई पुन्हा भेटते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.