मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले? ओमराजेंबद्दलही बोलले
मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्यांची संख्या वाढण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय बंडू जाधव यांची नावं आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रिपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर बंडू जाधव यांनी आपल्याला मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.

शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे येत्या 30 ऑगस्ट रोजी परभणी दौऱ्यावर येणार असून, परभणीत त्यांचा शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याची माहिती परभणीचे खासदार संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जाधव यांनी सुप्रीम कोर्टातील सुनावणी, उद्धव ठाकरे गटाकडून सहा खासदारांना मिळालेली नोटीस, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, परभणीचा विकास निधी आणि डिफेंडर गाडी घेतल्याच्या चर्चेवरही भाष्य केलं.
परभणीत शेतकरी-शिवसैनिक संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या माध्यमातून एकनाथ शिंदे परभणीतील शिवसैनिक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या अडचणी, विकासकामांचे विषय जाणून घेऊन कार्यकर्त्यांना या मेळाव्यातून बळ देणार असल्याचं बंडू जाधव यांनी सांगितलं.
“अडचणीत सापडलेल्या कार्यकर्त्याच्या किंवा नेत्याच्या मदतीला धावून जाणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे परभणी शहराच्या आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची आपल्याला गरज आहे,” असंही त्यांनी म्हटलं.दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत विचारलं असता बंडू जाधव म्हणाले, “मला मंत्रिमंडळ विस्ताराची माहिती नाही, मोदी साहेबांना विचारा. केंद्राने विस्तार कधी करावा हे भाजपचे नेते ठरवतील. केंद्राने विस्तार ठरवला आणि माझ्या पक्षाने माझं नाव सुचवलं तर मला संधी मिळेल. सुचवलं किंवा नाही सुचवलं तरी मी चिंता करत नाही. मला संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के आहेत, असं मला वाटतं.”
“आमच्यात जेवढे आहेत तेवढ्यांना सगळ्यांनाच वाटतं. आमच्या ओमराजेंना वाटतं, आमचे जुने बारणे आप्पा आहेत, त्यांनाही वाटतं आणि मलाही वाटतं. हे वाटणं साहजिक आहे. मात्र, द्यायचं की नाही द्यायचं हे नेत्याच्या हातात असतं,” असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.उद्धव ठाकरे गटाकडून खासदारांना आलेल्या नोटीसबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्हाला नोटीस आल्याचा विषय पार्टी बघेल. पार्टीने वकील लावलेले आहेत. त्यांना नोटीस दिली असेल तर मलाही आली असेल. मात्र, जेव्हा आम्ही हा निर्णय घेतला, तेव्हा या सगळ्या गोष्टींना फेस करायचं आहे, याचा विचार करूनच निर्णय घेतला होता,” असं बंडू जाधव यांनी सांगितलं.




