जेन-जीसोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपची विशेष टीम; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी

जेन-जीसोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपची विशेष टीम; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी

मुंबई (प्रतिनिधी) : भाजपने ‘जनरेशन-जी’ म्हणजेच तरुण मतदारांशी संपर्क साधण्यासाठी विशेष टीम तयार केली आहे. यामध्ये भाजप अध्यक्ष नितीन नवीन, राष्ट्रीय सरचिटणीस स्मृती इराणी आणि विनोद तावडे यांच्यासह गुजरातचे मंत्री हर्ष संघवी आणि छत्तीसगडचे मंत्री ओ. पी. चौधरी यांचा समावेश आहे. या टीमच्या माध्यमातून पक्ष तरुणांशी थेट संवाद साधून त्यांचे विचार, समस्या आणि अपेक्षा जाणून घेणार आहे.

दरम्यान, नितीन नवीन यांच्या अध्यक्षतेखालील नवीन 65 सदस्यीय राष्ट्रीय टीमची पहिली बैठक दिल्लीतील भाजप मुख्यालयात पार पडली. ‘वंदे मातरम’च्या संदर्भात काँग्रेसच्या निर्णयाविरोधात यावेळी ठराव मंजूर करण्यात आला. काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीताचे केवळ दोन परिच्छेद गाण्याच्या निर्णयाचा भाजपने निषेध केला.

राजकीय सोयीसाठी किंवा लांगुलचालनासाठी ‘वंदे मातरम’च्या सन्मानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं पक्षाने स्पष्ट केलं आहे. भाजपकडून देशभरात ‘वंदे मातरम’चा वारसा जपण्यासाठी मोहीमही सुरू केली जाणार आहे.नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखालील नवीन टीम आज (22 ऑगस्ट) सायंकाळी 7 वाजता भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. या टीमची घोषणा 17 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती.

दरम्यान, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टीमच्या बैठकीपूर्वी भाजप मुख्यालयात ‘वंदे मातरम’चे सर्व सहा परिच्छेद गाण्यात आले. यानंतर आगामी निवडणुका, संघटना मजबूत करणे आणि पक्षाच्या कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली.नितीन नवीन यांनी सांगितलं की, पक्ष देशभरात ‘वंदे मातरम’चा सन्मान, प्रतिष्ठा आणि वारसा जपणार आहे. स्वातंत्र्य चळवळीतील वंदे मातरमचा इतिहास, अर्थ आणि महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. विशेषतः तरुणांमध्ये जनजागृती केली जाईल, जेणेकरून नवीन पिढीला संपूर्ण वंदे मातरम आणि त्याच्याशी संबंधित इतिहास समजेल.

भाजप अध्यक्ष झाल्यानंतर 209 दिवसांनी, 17 ऑगस्ट रोजी नितीन नवीन यांनी 65 सदस्यीय नवीन टीमची घोषणा केली. यामध्ये 51 नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे. या टीममध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि 8 राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.नवीन टीममध्ये पुढील वर्षी निवडणुका होणाऱ्या चार राज्यांतील 18 नेत्यांनाही स्थान देण्यात आलं आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील 8, उत्तराखंडमधील 4, गुजरातमधील 4 आणि पंजाबमधील 2 नेत्यांचा समावेश आहे.