साखरेचे भाव निम्म्यावर आणा, दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई (प्रतिनिधी) : देशभरात साखरेच्या दरात मोठी वाढ होत आहे. ऐन सणासुदीच्या काळात सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडत आहे. नागरिकांचं आर्थिक गणितही कोलमडलं असल्याचं चित्र आहे. या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने महसूल वाढवण्यासाठी दारूच्या किमतीत दहा पटीने वाढ करावी आणि साखरेचे भाव निम्म्यावर आणावेत, अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.

सरकारच्या निर्णयांविरोधात सामान्य नागरिक आंदोलन करत नाहीत, कारण त्यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल होतात. त्यामुळे जनता आंदोलन करत नाही, याचा अर्थ सरकार जे काही करत आहे ते सर्वच योग्य आहे, असं नाही, असा टोमणाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.“राज्यामध्ये तीन दिवसांत साखरेच्या भावात न परवडणारी वाढ झालेली आहे. हिंदू धर्मामध्ये सणासुदीला गोडधोड केलं जातं आणि यासाठी प्रामुख्याने साखर लागते. राज्यामध्ये महिलांना हातभार लावण्यासाठी आपण लाडकी बहीण योजना सुरू केली. कारण लाडक्या बहिणीची परिस्थिती चांगली नाही.
राज्यामध्ये सणवाराला घरगुती पदार्थ करण्यात लाडकी बहीणच अग्रेसर असते. अशा परिस्थितीत या लाडक्या बहिणीला साखर विकत घेणं परवडत नसेल, तर या महिलांना आपण लाडकी बहीण म्हणून त्यांचा अपमान करत आहात,” असं सुबोध सावजी यांनी पत्रात म्हटलं आहे.साखर, खाद्यतेल आणि कडधान्य यांचे भाव कौटुंबिक वापरासाठी अर्ध्यावर आणावेत, अशीही मागणी त्यांनी केली आहे. “ज्या दारूमुळे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत आणि तरुण पिढी बरबादीकडे जात आहे, अशा दारूचे भाव आपण दहा पटीने वाढवल्यास राज्याला मोठा महसूल मिळेल. सरकारचा घाटाही भरून निघेल,” असं त्यांनी म्हटलं आहे.
तसंच साखर, खाद्यतेल आणि इतर घरगुती वस्तूंचे भाव नियंत्रणात ठेवल्यास जनता सुखी राहील, असा दावा त्यांनी केला आहे.महाराष्ट्र विधानसभेत आणि विधान परिषदेत सरकारकडे मोठं बहुमत आहे. त्यामुळे सरकार कोणताही कायदा करत असेल तरी तो सहज पारित होतो. आपल्या निर्णयाला कोणी विरोध करत नाही. जनतेने स्वसंरक्षणासाठी आंदोलन केलं तर त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई होते.“जनता आंदोलन करत नाही, याचा अर्थ असा नाही की आपण जे करत आहात ते सर्व चांगलंच आहे. आमच्या मागणीचा आपण विचार करावा,” अशी अपेक्षाही सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे.




