वाघापूर येथे आबिटकर डिप्लोमा इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न

वाघापूर येथे आबिटकर डिप्लोमा इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न

गारगोटी (प्रतिनिधी) : श्री आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पॉलीटेकनिक विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) उपक्रमांतर्गत वाघापूर (ता.भुदरगड) येथे नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या अभियानात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेत वाघापूर परिसरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली. तसेच ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे आवाहन केले.

या वेळी विद्यार्थ्यांनी “स्वच्छ गाव, सुंदर गाव”,“स्वच्छता हीच सेवा” अशा घोषणांद्वारे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली. विद्यार्थ्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. या स्वच्छता अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवेची भावना रुजण्यास मदत झाली. यावेळी वाघापूरचे सरपंच बापूसो आरडे, उपसरपंच बाळासाहेब शिंदे, युवराज आरडे, पोलीस पाटील दत्तात्रय घाडगे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांचे उपस्थित होते.