सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांकांना मारहाणीनंतर अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
मुंबई (प्रतिनिधी) : राजस्थानमधील जयपूर येथे सरकारी शाळेच्या दिशेने जाणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या टीमवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या टीममध्ये सीजेपीचे सह-संयोजक आणि प्रवक्ते आशुतोष रांका यांचाही समावेश होता. या हल्ल्याचा आरोप गावकऱ्यांवर करण्यात आला आहे.सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दावा केला की, राजस्थानमध्ये भाजपच्या गुंडांनी आशुतोष रांका यांच्यावर हल्ला केला. आशुतोष रांका आणि CJPच्या इतर सदस्यांना मारहाण करण्यात आली असून ते जखमी झाले आहेत. राजस्थान पोलिसांनी हे घडू दिले, असाही आरोप त्यांनी केला.

सीजेपीच्या दाव्यानुसार, हल्ला करणारे सामान्य नागरिक नसून भाजपचे कार्यकर्ते होते आणि पूर्वनियोजित पद्धतीने हा हल्ला करण्यात आला. मात्र, आता या संपूर्ण प्रकरणावर गावकऱ्यांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी सीजेपीचे आरोप फेटाळून लावले आहेत.हल्ला गावकऱ्यांनी केला नसून सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच आपल्या गाड्यांच्या काचा फोडल्या आणि देशविरोधी घोषणा दिल्या, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
गावातील एका नागरिकाने सांगितले की, “सीजेपीचे लोक येथे आले होते. तेव्हा आम्ही त्यांना प्रेमाने समजावून परत पाठवले होते. त्यानंतर गावकरीही तिथून निघून गेले. मात्र, काही वेळातच 50 ते 60 लोक पुन्हा आले. त्यांच्यासोबत महिलाही होत्या आणि त्यांच्या गाड्यांमध्ये शस्त्रास्त्रे होती. आम्ही त्यांना पुन्हा रोखण्याचा प्रयत्न केला असता त्या महिला असभ्यपणे वागू लागल्या. गावकऱ्यांशी गैरवर्तन केले जाते, तेव्हा गावकरीही त्याला उत्तर देतात. जो कोणी देशविरोधी घोषणा देईल, त्याला आम्ही सोडणार नाही.”
दुसरे गावकरी लालचंद शर्मा यांनी दावा केला की, गावकऱ्यांना अडकवण्यासाठी सीजेपीच्या लोकांनी स्वतःच काठ्या चालवल्या. “आम्ही त्यांचा दिल्लीतील निषेध मोर्चाही पाहिला आहे. तिथेही हे लोक देशविरोधी घोषणा देत होते. तीच गोष्ट आम्हाला अजूनही खटकत आहे. आम्ही त्यांना गावात अजिबात येऊ देणार नाही,” असे शर्मा यांनी म्हटले.
“सीजेपीचे लोक शाळा सुधारण्यासाठी आले असताना गावकऱ्यांनी त्यांना विरोध का केला?” असा प्रश्न विचारला असता एका गावकऱ्याने सांगितले की, “सीजेपीचे लोक शाळा सुधारण्यासाठी नव्हे, तर स्वतःचे पाय रोवण्यासाठी आणि राजकारण करण्यासाठी येथे येत आहेत. त्यांचा दुसरा कोणताही उद्देश नाही. आमच्या येथील शाळेसाठी निधी मंजूर झाला असून लवकरच प्रत्यक्ष कामही सुरू होणार आहे.”सीजेपी ही देशविरोधी पार्टी असून त्यांना परदेशातून फंडिंग मिळते, असाही दावा संबंधित गावकऱ्यांनी केला. अशा पक्षाला आणि देशाशी गद्दारी करणाऱ्यांना आमच्या गावात कधीही पाय ठेवू देणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीच्या शाळा भेटींविरोधात जयपूरमध्ये विरोध सुरू आहे. बागरू येथील रामपुरा कंवरपुरा येथील शासकीय प्राथमिक शाळेची पाहणी करण्यासाठी आलेले सीजेपीचे सह-संयोजक आणि प्रवक्ते आशुतोष रांका तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना गावकऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. रांका आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दगडफेकही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. महिलांनी रांका यांच्या महिला समर्थकांवर चिखलफेक केल्याचा दावा करण्यात आला आहे.
दुसरीकडे, सीजेपीच्या काही कार्यकर्त्यांची गावकऱ्यांशी झटापट झाली. त्यानंतर गावकऱ्यांनी सीजेपीच्या कार्यकर्त्यांना गावातून हाकलून दिले. सीजेपीविरोधात घोषणाबाजी करत गावकऱ्यांनी शासकीय शाळेबाहेर धरणे आंदोलन केले. ट्रॅक्टर-ट्रॉली लावून मुख्य रस्ताही अडवण्यात आला आणि वाहनांची तपासणी केली जात होती.
शाळेची दुरुस्ती आम्ही स्वतःच्या खर्चाने करू, असे गावकऱ्यांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले. सरकारने शाळेसाठी 12.50 लाख रुपयांच्या निधीलाही मंजुरी दिल्याचे त्यांनी म्हटले. कोणत्याही बाहेरील व्यक्तीला येथे येऊ देणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.रामपुरा येथील शाळा जीर्ण इमारतीमुळे बंद करण्यात आली असून विद्यार्थ्यांना जवळच्याच एका आवारात शिकवले जात आहे. सीजेपीची टीम जयपूरमधील दोन सरकारी शाळांना भेट देणार होती. या भेटीदरम्यानच हा वाद निर्माण झाला.




