अजिंक्य रहाणेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अखेरचा सलाम; भावूक व्हिडीओद्वारे निवृत्तीची घोषणा

अजिंक्य रहाणेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अखेरचा सलाम; भावूक व्हिडीओद्वारे निवृत्तीची घोषणा

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर भावूक व्हिडीओ शेअर करत त्याने आपल्या निर्णयाची माहिती चाहत्यांना दिली. या पोस्टमधून रहाणेने BCCI, सहकारी खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांचे मनापासून आभारही मानले.

गेल्या काही वर्षांपासून तो भारतीय संघाबाहेर होता. एकेकाळी विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारासोबत भारताच्या कसोटी संघाच्या मधल्या फळीचा महत्त्वाचा आधार असलेला रहाणे, फॉर्म घसरल्यानंतर संघातून बाहेर पडला. त्याने भारतासाठी अखेरचा कसोटी सामना जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. तर त्याचा शेवटचा वनडे सामना 2018 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 2016 मध्ये झाला होता.

रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने 2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऐतिहासिक बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकली होती. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आणि अनेक प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त असतानाही भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर 2-1 ने पराभूत करत इतिहास रचला. हा विजय रहाणेच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा क्षण मानला जातो.

निवृत्तीची घोषणा करताना रहाणेने लिहिले, प्रत्येक प्रवासाला एक सुरुवात आणि एक शेवट असतो. योग्य वेळ ओळखून पुढे जाणं महत्त्वाचं असतं. आज मला वाटतं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.

शांत, संयमी आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम फलंदाजीसाठी ओळखला जाणारा अजिंक्य रहाणे भारतीय क्रिकेटमधील विश्वासार्ह खेळाडूंपैकी एक राहिला. परदेशातील संस्मरणीय खेळी, नेतृत्वगुण आणि ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक मालिका विजयामुळे त्याचे नाव भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कायम स्मरणात राहील.