बत्तीस शिराळा येथील नागपंचमी उत्सवातील आक्षेपार्ह नृत्यप्रकाराविरोधात जिजाऊ ब्रिगेडतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सांगली (प्रतिनिधी) : बत्तीस शिराळा येथील नागपंचमी उत्सवात धार्मिक गीतांवर अश्लील व आक्षेपार्ह नृत्य सादर केल्याप्रकरणी संबंधित आयोजकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी 'जिजाऊ ब्रिगेड'च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.

नागपंचमी हा महाराष्ट्राचा एक अत्यंत पवित्र आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेला सण आहे. या उत्सवाचे धार्मिक व सांस्कृतिक पावित्र्य जपले जावे, यासाठी प्रशासनाने या संपूर्ण प्रकाराची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम मागणी यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
उत्सवाच्या नावाखाली होणाऱ्या अशा विकृत आणि अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने योग्य ती प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी, अशी आग्रही भूमिका या निवेदनाद्वारे मांडण्यात आली.
या शिष्टमंडळात जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय कार्याध्यक्षा चारुशीला पाटील, जिल्हाध्यक्षा वनिता निंबाळकर, जिल्हा सचिव सुमन वागळे, प्रवक्ता अश्विनी पाटील आणि संघटक सर्वदा हरणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.




