स्मार्ट मीटर सक्तीविरोधात शिवसेना मैदानात! महावितरणच्या अभियंत्यांसोबत झालेल्या बैठकीत काय ठरलं?
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहरात महावितरणकडून ग्राहकांना विश्वासात न घेता सुरू असलेल्या 'स्मार्ट मीटर' जोडणीचा वाद आता चांगलाच पेटला आहे. या सक्तीच्या आणि मनमानी कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्णपणे मैदानात उतरला आहे. ६ जुलै रोजी शिवसैनिकांनी महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन ही सक्ती तात्काळ थांबवण्याची मागणी केली होती.

याच आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून आज महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. कोल्हापूरकरांवर जबरदस्तीने 'स्मार्ट मीटर' लादले जाऊ नयेत, यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीदरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. "ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता घाईघाईने मीटर्स बदलणे आणि त्यानंतर बिलांमध्ये तफावत येणे, हा सामान्य जनतेवर अन्याय आहे," अशी भूमिका शिवसेनेने मांडली.
तर स्मार्ट मीटर संदर्भात तुमच्या मनात जे समज गैरसमज आहेत ते आठ दिवसात दूर केले जातील असे आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिले आहे .
आज झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला शिवसेना शहरप्रमुख विशाल देवकुळे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.




