युवकासाठी श्रावण सोमवारची कावड यात्रा ठरली अखेरची...

बुलढाणा - श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार असल्याने आज देशभरात भक्तिमय वातावरण आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा मार्गावर मात्र या भक्तीला अपघाताचे सावट आले. पहाटे सुमारे तीन ते साडेतीन वाजेदरम्यान पाडळी आणि पळसखेड गावांच्या दरम्यान भरधाव मोटरसायकलने कावड यात्रेतील भाविकांना जोरदार धडक दिली. या दुर्दैवी अपघातात मुकेश गजानन राठोड (वय २५, रा. करवंड) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. यात मोटरसायकलस्वार ऋषिकेश काकडे आणि मनोज माळोदे हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही कावड यात्रा काल सायंकाळी सातच्या सुमारास गूळभेली येथून बुद्धनेश्वर मंदिराकडे निघाली होती. सुमारे ४० पेक्षा अधिक तरुण या यात्रेत सहभागी झाले होते. रात्री बारा वाजता मंदिरात आरती झाल्यानंतर यात्रेने परतीचा प्रवास सुरू केला. त्याच वेळी एका मोटरसायकलने मागून येत मुकेश राठोड यांना जोरदार धडक दिली.
या धडकेत योगेश चव्हाण आणि आणखी एक कावडधारी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मुकेश राठोड यांचा उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुले असून त्यांच्या मृत्यूमुळे करवंड व गूळभेली गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.