कराडमध्ये कृष्णा नदीत उडी मारलेल्या तरुणीचा मृतदेह 'इतक्या' दिवसांनी सापडला

कराड - कराड शहरातील कृष्णा नदीच्या पुलावरून उडी घेणाऱ्या 26 वर्षीय तरुणीचा मृतदेह सात दिवसांच्या शोध मोहिमेनंतर रविवारी आढळून आला. मृतदेह कराड तालुक्यातील गोंदी गावाच्या हद्दीतील नदीपात्रात सापडला. या तरुणीचे नाव कल्पना बाळाप्पा वाघमारे (रा. वाखाण रोड, कराड; मूळ रा. जत, जि. सांगली) असे आहे.
विशेष म्हणजे, आत्महत्येच्या दोन दिवस आधीच तिचा साखरपुडा झाला होता, त्यामुळे तिने टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे कराड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.
28 जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास कल्पना दुचाकीवरून कृष्णा नदीच्या पुलावर आली होती. तिने मोबाईलवर कुणाशी तरी संवाद साधल्यानंतर थेट नदीत उडी घेतली. घटनास्थळी सापडलेल्या सॅकमधील वस्तू व इतर पुराव्यांवरून ही व्यक्ती कल्पनाच असल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट झालं होतं.
त्यानंतर एनडीआरएफच्या जवानांसह स्थानिक मच्छीमारांकडून सलग सहा दिवस नदीपात्रात शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर रविवारी नदीपात्रात मृतदेह सापडला. मृतदेहाची ओळख सडलेल्या अवस्थेमुळे कठीण होती, मात्र कुटुंबीयांनी दोन्ही हातांवरील टॅटूवरून तो कल्पनाच असल्याची ओळख पटवली.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) राजश्री पाटील यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, ही घटना कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे पुढील तपास शहर पोलीस करत आहेत, अशी माहिती उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील यांनी दिली.