बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शाळांच्या वेळेत बदल ; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीचे आदेश
School Time News - गेल्या काही दिवसांपासून पुणे, नाशिक, अहमदनगर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये बिबट्यांचा वाढता वावर आणि हल्ल्यांच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी निष्पाप नागरिकांसह लहान मुलांचेही मृत्यू झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत. या आदेशानुसार, बिबट्यांच्या हालचालींच्या क्षेत्रातील शाळांच्या वेळांत बदल करण्यात आला असून जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

अहिल्यानगरमधील विशेषतः पारनेर आणि नगर तालुक्यांमध्ये विद्यार्थ्यांवर बिबट्यांचे हल्ले झाल्याच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. काही विद्यार्थ्यांना दुखापतही झाली आहे. अनेक विद्यार्थी दररोज ऊस शेती, जंगल आणि डोंगराळ भागातून पायी प्रवास करत असल्याने त्यांचा धोका अधिक वाढला आहे. ऊस तोडणीमुळे शेतीचे क्षेत्र खुलं होत असल्याने बिबट्यांचा वावर अधिक जाणवतो.
हिवाळ्यात लवकर अंधार पडत असल्याने विद्यार्थी शाळेतून परतताना अधिक असुरक्षित होतात. या धोक्याची दखल घेत, अशा संवेदनशील भागातील शाळांना सकाळी ९:३० ते दुपारी ४:०० या वेळेत कामकाज करण्याची परवानगी देण्यात आली आहे, जेणेकरून विद्यार्थी अंधार पडण्यापूर्वी घरी पोहोचू शकतील. शाळा व्यवस्थापन समितीच्या मंजुरीनंतरच या वेळेत बदल लागू करण्यात येतील.

जिल्ह्यातील सर्व शाळांना तातडीचे सुरक्षा जनजागृती कार्यक्रम राबवणे अनिवार्य केले आहे. विद्यार्थ्यांना प्रवासातील धोके आणि घ्यावयाची खबरदारी याबाबत माहिती दिली जाणार आहे. तसेच पालक-शिक्षक सभा आयोजित करून पालकांना मुलांना सुरक्षितपणे शाळेत आणणे-नेण्याबाबत जागरूक करण्याचे निर्देश दिले आहेत. वर्ग शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थी सुरक्षितपणे घरी पोहोचला आहे याची खात्री करावी, अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
याशिवाय, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक पायाभूत सुविधा विकास समितीने दर महिन्याला बैठक घेऊन अतिरिक्त सुरक्षाविषयक उपाययोजना आखाव्यात आणि त्यांची अंमलबजावणी करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. समायोजित वेळ स्वीकारलेल्या शाळांनी तत्काळ ही माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना कळवावी, असे आदेश गट शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच या पत्राची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आणि शिक्षण अधिकाऱ्यांना देऊन आवश्यक कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे.




