एकाच दिवसात १० लाख कोटी पाण्यात! बँकिंग शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा

एकाच दिवसात १० लाख कोटी पाण्यात! बँकिंग शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा

मुंबई (प्रतिनिधी) : सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. सुरुवातीला बाजार सावरण्याची चिन्हे दिसत असतानाच, दुपारनंतर विक्रीचा असा काही सपाटा लागला की गुंतवणूकदारांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुंबई शेअर बाजाराचानिर्देशांक तब्बल १,६३६ अंकांच्या घसरणीसह ७१,९४८ वर बंद झाला, तर निफ्टीने २२,४०० ची महत्त्वाची पातळी तोडत २२,३३१ अंकांपर्यंत खाली झेप घेतली.

आजच्या घसरणीत बँकिंग क्षेत्रातील दिग्गज शेअर्सनी 'व्हिलन'ची भूमिका बजावली. रिझर्व्ह बँकेने बँकांच्या फॉरेक्स व्यवहारांबाबत लागू केलेल्या कडक नियमांमुळे बँकिंग निर्देशांकावर मोठा दबाव आला. HDFC बँक, ICICI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ॲक्सिस बँक यांसारखे मोठे शेअर्स ५ टक्क्यांपर्यंत कोसळले. बँकांच्या ओपन डॉलर-रुपया पोझिशनवर मर्यादा आल्याने बाजाराचा मूड पूर्णपणे बिघडला.

आज केवळ शेअर बाजारच नव्हे, तर भारतीय रुपयानेही चिंतेत भर घातली. इतिहासात पहिल्यांदाच रुपया ९५ प्रति डॉलरच्या पार गेला आणि ९५.२२ डॉलर या विक्रमी निचांकी स्तरावर पोहोचला. यामुळे विदेशी गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी पुन्हा एकदा जोरदार विक्री सुरू केली आहे.

बाजारात 'वणवा' लागण्याची ५ प्रमुख कारणे : 

रुपयाची पडझड : रुपया १.२२ रुपयांनी मजबूत उघडल्यानंतर अचानक ५२ पैशांनी घसरून ९४ डॉलरच्या पार गेला.

कच्च्या तेलाचा भडका : ब्रेंट क्रूड ११६ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्याने महागाई वाढण्याची आणि भारताच्या परकीय चलन साठ्यावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.

युद्ध आणि जागतिक तणाव : अमेरिका-इराण युद्ध ५ व्या आठवड्यात पोहोचले असून पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने जागतिक बाजार कमकुवत झाले आहेत.

RBI चा निर्णय : बँकांच्या फॉरेक्स पोझिशनवर मर्यादा घातल्याने बँकिंग शेअर्समध्ये मोठी विक्री झाली.

विदेशी गुंतवणूकदारांची विक्री : परदेशी गुंतवणूकदार सातत्याने भारतीय बाजारातून पैसा काढून घेत असल्याने बाजारावरील दबाव वाढत आहे.