कोगे गावात तब्बल 35 वर्षानंतर माही उत्सव संपन्न

कोगे गावात तब्बल 35 वर्षानंतर माही उत्सव संपन्न

करवीर (प्रतिनिधी): कोगे तालुका करवीर येथे तब्बल 35 वर्षानंतर माही उत्सवास सुरुवात झाली. 35 वर्षांपूर्वी तीन दिवस माही उत्सव संपन्न होत होता . त्यावेळी गावातील सर्व लोक आपल्या पै-पाहुण्यांना बोलावून तीन दिवस मुक्कामी ठेवत असे .पहिला दिवस ग्रामदैवत चाळकोबास अभिषेक घालून मिरवणूक काढली जात असे .सर्व ग्रामस्थ व  लग्न होऊन गेलेल्या मुली व त्यांचे नातेवाईक यांनी एकत्र येऊन या उत्सवाची शोभा वाढायची .पण जसे दिवस बदलत गेले तशा प्रथा सुद्धा बदलत गेल्या.

 यामध्ये जुने जाणकार असणारी पिढी हळूहळू लोप पावत गेली .येणारी नवीन पिढी शिक्षण व इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या यांच्या ओझ्याखाली राहिल्यामुळे तसेच महागाईचा विचार केला तर तीन दिवस होणारी माही फक्त एक दिवसच होऊ लागली .त्यानंतर यावर्षी माही करू ? की पुढच्या वर्षी करू ? अशा पद्धतीच्या विचारांमध्येच गेली अनेक वर्षे बंद होती. 

हा माही उत्सव यावर्षी नवीन जाणत्या युवा पिढीने पुढाकार घेत एक नवीन विचार मांडण्याचा प्रयत्न केला. ग्रामदैवत चाळकोबा व त्यांची असणारी प्रथा जुन्या जाणत्या लोकांच्याकडून ऐकून यावर्षी अंमलात आणण्यासाठी प्रथमच पहिल्या वार्डामध्ये माही उत्सव संपन्न करण्यात आला. कोणत्याही कार्याची  सुरुवात कठीण असते,पण हळूहळू ती अंगवळणी पडून सवय होऊन जाते, या विचाराप्रमाणे यावर्षी मोठ- मोठाले पाळणे,लहान मुलांसाठी असणारे खेळणी दुकाने,पारंपारिक वाद्य तसेच डॉल्बी इत्यादी देखाव्याच्या माध्यमातून हा उत्सव सुरू करण्यात आला आहे .ग्रामदैवत चाळकेश्वर यांना अभिषेक घालून तरुण पिढी उत्साहाने हा माही उत्सव साजरा करताना दिसून आली. कोगे गावात इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच माहीला सुरुवात झाली.