एका धुरंधराचा सन्मान करण्यासाठी दुसरे धुरंधर पुण्यात"; देवेंद्र फडणवीसांकडून अमित शाह आणि अजित डोवाल यांचं कौतुक
मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना गुरुवारी पुण्यात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. स्वारगेट येथील महाराष्ट्र मंडळ, महर्षी नगर मैदानावर आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित डोवाल यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना राष्ट्रीय सुरक्षेतील 'चाणक्य'अशी उपमा दिली. तसेच अमित शाह यांच्या उपस्थितीचा उल्लेख करत, "एका धुरंधराला पुरस्कार देण्यासाठी दुसरे धुरंधर आले आहेत, असे म्हणत त्यांचेही कौतुक केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले,राष्ट्रीय सुरक्षेला नवी दिशा देणारे आणि संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठी समर्पित करणारे अजित डोवाल यांना हा पुरस्कार मिळाल्याचा मनापासून आनंद आहे. याहून विशेष आनंदाची बाब म्हणजे, एका धुरंधराचा सन्मान करण्यासाठी दुसरे धुरंधर या ठिकाणी उपस्थित आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रातील चाणक्य असलेल्या अजित डोवाल यांना राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमित शाह यांच्या हस्ते पुरस्कार मिळणं हा खऱ्या अर्थाने दुग्धशर्करा योग आहे.
ते पुढे म्हणाले, २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर त्यांनी देशाच्या सुरक्षा धोरणात मोठा बदल घडवून आणला. राष्ट्रीय सुरक्षेची नवी रणनीती आणि कूटनीती त्यांनी विकसित केली. आजचा भारत हा फक्त हल्ले सहन करणारा देश राहिलेला नाही, तर आवश्यक असेल तेव्हा शत्रूच्या घरात घुसून प्रत्युत्तर देणारा देश बनला आहे. या बदलामागे अजित डोवाल यांची महत्त्वाची भूमिका आहे.
फडणवीस यांनी डोवाल यांच्या विचारांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, "There is no silver medal in national security. If you win, you make history. If you lose, you become history." हे त्यांचं वाक्य राष्ट्रीय सुरक्षेचं महत्त्व अधोरेखित करणारं आहे.
शेवटी त्यांनी म्हटलं, वेळोवेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून देशासाठी काम करणाऱ्या आणि कधीही पदक किंवा पुरस्काराची अपेक्षा न ठेवणाऱ्या व्यक्तीला आज हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळत आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.




