ऑपरेशन टायगर'बाबत उदय सामंतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार फुटण्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण

ऑपरेशन टायगर'बाबत उदय सामंतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार फुटण्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण

मुंबई (प्रतिनिधी) : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधील 20 खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या चर्चेमुळे देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्याचवेळी, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली होती.

मात्र, या बैठकीला केवळ चार खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहिले, तर पाच खासदारांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला. त्यामुळे विविध राजकीय तर्क-वितर्कांना आणखी हवा मिळाली. दरम्यान, कथित 'ऑपरेशन टायगर' संदर्भात शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.

"उबाठा गटाच्या कोणत्याही खासदाराशी आमचा संपर्क नाही. अशा प्रकारची कोणतीही बैठक झालेली नाही. आम्हाला 'ऑपरेशन टायगर'ची गरज नाही," असे स्पष्ट वक्तव्य उदय सामंत यांनी केले. तसेच, "संजय राऊत यांच्या संयमामुळे आणि प्रयत्नांमुळे उबाठा गटाचे अस्तित्व टिकून आहे," असेही ते म्हणाले. त्यामुळे ठाकरे गटातील खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना त्यांनी अप्रत्यक्षपणे पूर्णविराम दिल्याचे मानले जात आहे.

खासदारांच्या बैठकीनंतर आता उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठकही बोलावली आहे. सोमवार, 22 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजता मंत्रालयासमोरील 'शिवालय' येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधीमंडळ पक्षाच्या विधानसभा आणि विधानपरिषदेतील सर्व सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार असून, सर्व सदस्यांनी वेळेत उपस्थित राहावे, अशा आशयाचे पत्र पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे.