छत्रपती राजाराम महाराज जयंती उत्साहात साजरी; राजारामपुरी विकास मंचचा पुढाकार

छत्रपती राजाराम महाराज जयंती उत्साहात साजरी; राजारामपुरी विकास मंचचा पुढाकार

कोल्हापूर/प्रतिनिधी  कोल्हापुरात छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली आहे. राजारामपुरी विकास मंचच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात महाराजांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याला उजाळा देण्यात आला शाळा नंबर च्या ग्राउंडवर झालेल्या या कार्यक्रमात नगरसेविका प्रज्ञा उत्तुरे यांच्या शुभहस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या सोहळ्यात श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज उर्दू-मराठी शाळेचे शिक्षक,विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापिका आस्मा सय्यद यांनी स्वागत केले, तर असीम पटेल यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी राजारामपुरी विकास मंचचे अध्यक्ष ॲड. अनिल घाटगे यांनी राजाराम महाराजांच्या थोर शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. राजाराम कॉलेज, बी.टी. कॉलेज आणि साईक्स लॉ कॉलेजची स्थापना करून महाराजांनी मुलींच्या सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया रचल्याचे त्यांनी सांगितले.

प्रमुख पाहुण्या प्रज्ञा उत्तुरे यांनी मार्गदर्शन करताना, राजाराम महाराज हे एक द्रष्टे शासक होते, ज्यांनी शाहू महाराजांचे स्वप्न पूर्ण करत कोल्हापूर संस्थानाचे नाव सातासमुद्रापार नेले आणि कलाकार-खेळाडूंना भरीव मदत केली, असे गौरवोद्गार काढले.  कार्यक्रमात उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराजांवर विचार मांडले. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊवाटप करून किशोर खानविलकर यांच्या आभार प्रदर्शनाने या प्रेरणादायी कार्यक्रमाची सांगता झाली.