थोडीशीही लाज असेल तर शहांचा राजीनामा घ्या"; मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधान मोदींना थेट आव्हान
नवी दिल्ली : दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज, पॅलेट गनचा वापर आणि त्यानंतर विद्यार्थ्यांवर सूडाने सुरू असलेल्या कारवाईवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आक्रमक झाले आहेत. आंदोलन मागे घेताना दिलेल्या आश्वासनांवरून सरकार फिरल्याचा आरोप करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी खरगे यांनी केली आहे.

विरोधकांचा आक्रमक पवित्रा
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यापूर्वीच दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील अत्याचारावरून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (X) वर पोस्ट करत आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारच्या या दडपशाहीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मल्लिकार्जुन खरगे 'एक्स'वर काय म्हणाले?
खरगे यांनी आपल्या पोस्टमध्ये २० जुलै रोजी दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या बळाचा तीव्र निषेध केला आहे:
· दडपशाहीचा आरोप: दहा दिवसांपूर्वी सरकारने तरुणांवर लाठी-काठ्या आणि पॅलेट गनचा वापर करून दडपशाही केली.
· आश्वासनांचा विसर: विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतल्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत आणि त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतले जात आहे, असा दावा खरगेंनी केला.
· राजीनाम्याची मागणी: सरकारच्या या धोरणावर ताशेरे ओढत, "थोडीही लाज शिल्लक असेल तर अमित शाह यांचा राजीनामा घ्या," असे खडेबोल त्यांनी पंतप्रधान मोदींना सुनावले आहेत.
“तरुणांनी आंदोलन या अटीवर मागे घेतले होते की त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, परंतु आता सरकारे स्वतःच्या शब्दावरून मागे फिरली आहेत.” असं खरगे म्हणाले. तरुणांची सोशल मीडिया अकाऊंट्स बंद केली जात आहेत आणि मुलींची वैयक्तिक माहिती सार्वजनिक केली जात आहे, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
गृहमंत्री अमित शाह संसदेत पाऊल ठेवू शकले नाहीत आणि जबाबदारीसंदर्भात निवेदन देण्यापासून ते दूर राहिले. आता “प्रतिमा वाचवण्याचे डावपेच चालणार नाहीत, तरुणांना तुमचे सत्य कळून चुकले आहे.” अस म्हणत “थोडीशीही लाज उरली असेल तर अमित शाह यांचा राजीनामा घ्या.” असं खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांना उद्देशून म्हटलं.




