मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन नॉन-इश्यूला इश्यू करून; कोणाच्यातरी इशाऱ्यावरून आंदोलन? आशिष जयस्वालांचा गंभीर आरोप

मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन नॉन-इश्यूला इश्यू करून; कोणाच्यातरी इशाऱ्यावरून आंदोलन? आशिष जयस्वालांचा गंभीर आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन नॉन-इश्यूला इश्यू करून होत आहे. हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळालं आहे. आपला देश कायद्यावर चालणार आहे. व्हॅलिडिटी कमिटीचं काम प्रत्येक गोष्टीची तपासणी करणं आहे. माधुरी पाटील यांचा जो निकाल आला, त्यामध्ये आवश्यक कागदपत्रांमध्ये काही चुकीचं केलं असेल तर न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे.

 मात्र, अशा पद्धतीने महाराष्ट्रात अराजकतेचं वातावरण निर्माण करून, ज्यांनी सर्वाधिक मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं, त्यांच्याबद्दल समाजात भ्रम निर्माण करणं योग्य नाही. हे आंदोलन कोणाच्यातरी इशाऱ्यावरून, द्वेषातून आणि पूर्वग्रहदूषित भावनेतून होत असल्याचं माझं स्पष्ट मत आहे, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. ज्यांनी आतापर्यंत मराठा समाजाला अनेक योजनांपासून वंचित ठेवलं आणि ज्यांनी मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं, त्यांच्याबद्दल आज जनतेमध्ये भ्रम निर्माण करून खोटं नॅरेटिव्ह पसरवलं जात आहे. हे आता मराठा समाजातील लोकांनाही कळून चुकलं आहे, असंही आशिष जयस्वाल म्हणाले.

 राज्यात मागील वर्षी अतिवृष्टी झाल्यानंतर सरकारने हजारो कोटी रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली होती. आताही कर्जमाफीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे. सध्या उद्भवलेल्या संकटामुळे सरकार प्रत्येक जिल्ह्यावर लक्ष ठेवून आहे. आम्ही शेतकऱ्यांना कधीच वाऱ्यावर सोडलं नाही. इतिहासात शेतकऱ्यांना मदत करण्याचा आमच्या सरकारचा विक्रम आहे. सरकारसमोर आर्थिक अडचणी येत असतात, मात्र आम्ही त्या अडचणी शेतकऱ्यांना सांगत नाही. शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम आम्ही करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

 दिशा सालियन प्रकरणाबाबत बोलताना, ही एक प्रक्रिया आहे. त्याबद्दल तपास करणारे अधिकारीच बोललेले योग्य ठरेल. मात्र, प्रत्येक घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी, असं माझं मत आहे, असं आशिष जयस्वाल म्हणाले. तर रोहित पवार सध्या स्वतःला चर्चेत आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा, असा टोला देखील त्यांनी लगावला. दरम्यान, दर आठवड्याला राज्यातील परिस्थितीवर कॅबिनेटमध्ये चर्चा होत असते. जिल्हानिहाय आढावा घेण्याच्या सूचना सर्व पालकमंत्र्यांना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचंही त्यावर लक्ष आहे. एकंदरीत नुकसानीची आकडेवारी तपासून त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल, असंही आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केलं.