ठाकरेंना आणखी एक धक्का? श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या वैशाली दरेकरांचा पदाचा राजीनामा
मुंबई (प्रतिनिधी) : ठाकरे गटातील गळती थांबण्याची चिन्हे दिसत नसतानाच आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या वैशाली दरेकर राणे यांनी आपल्या महिला जिल्हा संघटक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्या पुढे कोणती राजकीय भूमिका घेणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

वैशाली दरेकर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, सध्या वैयक्तिक कारणांमुळे पक्षाच्या कामाला पुरेसा वेळ देता येत नसल्याने पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे, मी गेली दोन वर्षे महिला जिल्हा संघटक म्हणून कार्यरत आहे. मात्र वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे या पदाला न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे मी स्वेच्छेने माझ्या पदाचा राजीनामा देत असून तो स्वीकारावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
दरम्यान, ठाण्यात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीतही दोन गटांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर वैशाली दरेकर यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत घडामोडींना पुन्हा वेग आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.




