मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत विशेष सुरक्षा, अधिकारी-कर्मचारी सोबत

मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत विशेष सुरक्षा, अधिकारी-कर्मचारी सोबत

मुंबई (प्रतिनिधी) : मनोज जरांगे पाटील यांना मुंबई दौऱ्यासाठी SPU सुरक्षा देण्यात आली आहे. SPU अर्थात Special Protection Unit अंतर्गत एक पोलीस अधिकारी आणि एक पोलीस कॉन्स्टेबल सतत मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असणार आहेत. अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत मनोज जरांगे यांना ही विशेष सुरक्षा असणार आहे. सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा विभागाचा एक अधिकारी आणि एक कर्मचारी आजपासून तैनात करण्यात आले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज सकाळी 11 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.

 मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 18वा दिवस आहे. ते आज 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मोजक्या समर्थकांसह अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला मुंबई पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली आहे. रविवारी परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे यांच्यावतीने तिसऱ्यांदा अर्ज दाखल करण्यात आला आहे.

 मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई पोलिसांकडे पुन्हा अर्ज केला आहे. या तिसऱ्या अर्जातून 50 लोकांना आंदोलन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आम्ही सर्व नियम आणि अटी पाळू, 18 तारखेला दिलेल्या वेळेत आंदोलन करू, असंही नव्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. आज दुपारपर्यंत परवानगी दिली नाही, तर मनोज जरांगे दुपारी कोर्टात अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षीचा अनुभव : गेल्या वर्षी आंदोलनादरम्यान दक्षिण मुंबईत सुमारे 5 हजार वाहने अनधिकृतपणे उभी राहिल्याने संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्नही निर्माण झाले होते.

गणेशोत्सवाचा काळ : 14 सप्टेंबरपासून मुंबईत मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. या काळात मुंबईत भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई अतिशय संवेदनशील मानली जाते.

आझाद मैदानावरील जागेची मर्यादा : आझाद मैदानातील 7 हजार चौरस मीटर जागेत नियम 2025 नुसार कमाल 5 हजार आंदोलकच सामावू शकतात. मात्र, मनोज जरांगे यांनी लाखोंच्या संख्येने येण्याचं आवाहन केलं आहे.

वाहतूक आणि रुग्णसेवेचा प्रश्न : लाखो आंदोलक मुंबईत आल्यास दक्षिण मुंबईतील महत्त्वाची रुग्णालये, जसे जी.टी., कामा, सेंट जॉर्ज आणि बॉम्बे हॉस्पिटल, तसेच न्यायालये आणि आर्थिक केंद्रांच्या कामकाजावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.