भरत गोगावले अन् महेंद्र थोरवेंमुळेच विधानपरिषद निवडणुकीत ‘सरोगसी बाळ’ जन्माला आलं; महेंद्र दळवींनी तटकरेंना पुन्हा डिवचलं
मुंबई (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे. महायुतीमधील अंतर्गत वाद आता उफाळून आला असून, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोकण विधानपरिषद निवडणूक आणि कर्जतमधील विकासकामांच्या श्रेयवादावरून दोन्ही नेत्यांनी तटकरेंवर थेट निशाणा साधला.

आमदार महेंद्र दळवी यांनी विधानपरिषद निवडणुकीच्या मुद्द्यावरून सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरे यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत टीका केली. दळवी म्हणाले, “भरत गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यामुळेच विधानपरिषद निवडणुकीत ‘सरोगसी बाळ’ जन्माला आले. अनिकेत तटकरेंनी ‘सरोगसी बाळ’ म्हणजे काय, हे आधी त्यांच्या बापाला विचारावे. तटकरेंनी अशी किती सरोगसी बाळे जन्माला घातली आणि वाऱ्यावर सोडून दिली, हे देखील कळेल,” अशी टीका त्यांनी केली.
दळवी पुढे म्हणाले, “कोकणातील ही जागा शिवसेनेने लढवणे काळाची गरज होती. आम्ही निवडणूक लढलो असतो तर शिवसेनेचा आणखी एक आमदार नक्कीच वाढला असता. मात्र, आम्ही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असल्याने वरिष्ठ नेत्यांचे आदेश पाळले. आमच्या माघारीमुळे सुनील तटकरे यांची लढाई सोपी झाली आणि कोकणातील सरोगसी बाळ जन्माला आलं,” असेही त्यांनी म्हटले.
तटकरेंच्या घराणेशाहीवर प्रहार करताना दळवी म्हणाले, “तटकरेंनी स्वतःच्या मुलाला सोडून पक्षातील एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला आमदार केले असते, तर आम्हालाही आनंद झाला असता आणि ती स्व. अजित दादांना दिलेली खरी श्रद्धांजली ठरली असती. परंतु, ‘सगळं आपल्याच घरात पाहिजे’ हा तटकरेंचा स्थायी स्वभाव आहे. आज जर अजित पवार असते, तर सुनील तटकरे राष्ट्रवादीतून बाहेर असते,” असा दावा त्यांनी यावेळी केला.
दुसरीकडे, कर्जत येथील रेल्वे पुलांच्या मंजुरीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवाद पेटला आहे. सुनील तटकरे यांनी मुंबईत रेल्वे अधिकाऱ्यांसोबत राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांना घेऊन बैठक घेतली. या बैठकीनंतर कर्जतमधील राजकारण चांगलेच तापले आहे.पालकमंत्री भरत गोगावले यांच्या नागरी सत्कार सोहळ्यातच आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंना थेट इशारा दिला. थोरवे म्हणाले, “रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा चुकीचे राजकारण सुरू झाले आहे. गोगावले साहेब, तुम्ही आता तटकरेंना आवरा, अन्यथा आम्ही आणि महेंद्र दळवी पुन्हा पेटून उठू,” असे त्यांनी म्हटले आहे.
“आमच्या पदरात पुन्हा निराशा यायला लागलीय. राष्ट्रवादीने पुन्हा राजकारण करण्यास सुरुवात केलीय. कर्जतमधील रेल्वे पुलांच्या मंजुरीबाबत राष्ट्रवादी आणि शिवसेनेत श्रेयवादावरून लढाई सुरू आहे. राष्ट्रवादीने रडीचा डाव खेळण्यास सुरुवात केलीय. कर्जतमध्ये राष्ट्रवादीकडून चुकीचे राजकारण सुरू आहे. सुनील तटकरे यांच्या माध्यमातून कर्जतमध्ये चुकीचे काम सुरू आहे. शिवसेनेत चुकीचे काम खपवून घेतले जाणार नाही,” असेही महेंद्र थोरवे यांनी म्हटले आहे.




