‘हीच आमची लायकी!’ संतोष पंडितांनी मोबाईल, बेल्ट काढून घरच्यांकडे दिला; रात्री 1 वाजता पुणे पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?

‘हीच आमची लायकी!’ संतोष पंडितांनी मोबाईल, बेल्ट काढून घरच्यांकडे दिला; रात्री 1 वाजता पुणे पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?

पुणे (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून पुणे महानगरपालिकेच्या विकासकामांवर सातत्याने टीका करणारा मजकूर आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करणारे यू-ट्यूबर संतोष पंडित यांना पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी रात्री एक वाजता कोथरूड पोलिसांनी संतोष पंडित यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. प्राथमिक माहितीनुसार, संतोष पंडित यांनी कोथरूडमधील विकासकामांबाबत यू-ट्यूबवरील व्हिडीओच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह निर्माण करताना अश्लील शेरेबाजी केली होती. त्याविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात संतोष पंडित यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे नुकताच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर काल रात्री एक वाजता कोथरूड पोलिसांचे पथक संतोष पंडित राहत असलेल्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना अटक करण्यात आली. मात्र, यावेळी रस्त्यावर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. संतोष पंडित यांना अटक करण्यासाठी कोथरूड पोलीस दोन पांढऱ्या गाड्या घेऊन आले होते. काही पोलीस कर्मचारी सिव्हिल ड्रेसमध्ये होते. पोलिसांनी संतोष पंडित यांना अटक केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी व्हिडीओ शूटिंग सुरू केले.

पोलीस संतोष पंडित यांना गाडीत बसवत असताना त्यांनी या संपूर्ण प्रकाराला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. “पोलीस रात्री साडेबारा-एक वाजता आमच्या घरात घुसतात. आमच्यासारख्यांची तीच लायकी आहे,” असे संतोष पंडित म्हणाले. यावेळी त्यांनी खाकी वर्दीतील एका पोलीस अधिकाऱ्याशीही बोलण्याचा प्रयत्न केला. “माझ्याकडून तुम्हाला त्रास झाला असेल, सहकार्य करत नसेल असं वाटत असेल तर माफी मागतो. अटक केल्याबद्दल धन्यवाद,” असे संतोष पंडित यांनी म्हटले.

यानंतर संतोष पंडित यांनी पोलिसांना थांबवत आपला मोबाईल आणि गाडीची किल्ली तसेच कमरेचा पट्टा काढून आपल्या कुटुंबीयांकडे दिला. “पोलिसांना कोणत्या गोष्टींची गरज नाही, हे मला माहिती आहे,” असेही त्यांनी म्हटले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.संतोष पंडित हे सातत्याने पुणे महानगरपालिकेच्या विकासकामांबाबत आणि त्यामधील त्रुटींबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

काही दिवसांपूर्वी पंडित यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि शिवराळ मजकूर असलेली व्हिडीओ क्लिप पोस्ट केली होती. मंत्र्यांची जाहीर बदनामी केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी दोन संशयितांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक सुनील पांडे यांनी संतोष पंडित यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांना बगल देतात, अशा आशयाचा दावा करत या व्हिडीओमध्ये मंत्र्यांवर थेट टीका करण्यात आली होती.

मात्र, केवळ टीका न करता त्यात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ आणि असभ्य भाषेचा वापर केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.