‘बिस्किट घेऊ का?’ समय रैनाचा फडणवीसांना मजेशीर सवाल; मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने उपस्थितांमध्ये पिकला हशा
मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘डिजिटल अरेस्ट’ या विषयावरील सायबर जनजागृती चित्रपट ‘ऑपरेशन 1930’च्या ट्रेलरचे आणि ‘1930 सायबर अँथम’चे काल (26 ऑगस्ट) अनावरण करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अभिनेते शरद केळकर, जावेद जाफरी, आशिष विद्यार्थी, पंकज त्रिपाठी, सोनाली बेंद्रे, अभिषेक बॅनर्जी, मंगेश देसाई, गायिका सुनिधी चौहान आणि कॉमेडियन समय रैनासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान समय रैनाच्या एका मजेशीर कृतीने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समय रैनाचा सत्कार करण्यात आला. सत्कारासाठी समय रैना मुख्यमंत्र्यांच्या जवळ गेला, त्यावेळी त्याचं लक्ष समोर ठेवलेल्या बिस्किटांकडे गेलं.यानंतर समयने थेट मुख्यमंत्री फडणवीसांना ‘मी एक बिस्किट घेऊ का?’ असा मजेशीर सवाल केला. त्यावर फडणवीसांनीही ‘हो, नक्कीच’ असं उत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांची परवानगी मिळताच समयने समोरचं एक बिस्किट उचललं आणि तो तिथून निघून गेला. समय रैनाच्या या कृतीने देवेंद्र फडणवीसांसह उपस्थितांनाही हसू आवरलं नाही.
दरम्यान, या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचं आवाहन केलं. सायबर गुन्हेगारांकडून पोलीस, सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या नावाने नागरिकांना घाबरवून फसवणूक केली जाते. त्यामुळे अशा प्रकारांना बळी न पडता फसवणूक झाल्यास तातडीने 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असं त्यांनी सांगितलं.
सायबर फसवणुकीनंतरचा ‘गोल्डन अवर’ अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात तक्रार केल्यास पैसे रोखण्याची किंवा परत मिळवण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे फसवणूक झाल्याचं लक्षात येताच विलंब न करता 1930 वर संपर्क करण्याचं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं.




