‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’; नरहरी झिरवळांच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांचा संताप
पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील मांजरी येथे आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन गेल्या 14 दिवसांपासून सुरू आहे. आपल्या विविध 14 मागण्यांसाठी हजारो विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले असून, काही विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले आहेत. मागण्यांबाबत लेखी जीआर मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

दरम्यान, आंदोलनस्थळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करत आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती केली.मात्र, यावेळी नरहरी झिरवळ यांनी विद्यार्थ्यांना ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ असा सल्ला दिला. त्यांच्या या वक्तव्यावर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनीही त्यांना उत्तर दिलं. त्यामुळे झिरवळांच्या या विधानाची सध्या राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.
दुसरीकडे, अशोक उईके यांनी 15 जणांच्या विद्यार्थी शिष्टमंडळासोबत तब्बल 5 तास चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगण्यात आलं असलं, तरी अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर विचार करून निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली आहे.
मात्र, मागण्या मान्य झाल्याचं लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याच्या भूमिकेवर विद्यार्थी ठाम आहेत. 14 दिवसांच्या उपोषणामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याची चिंताजनक माहितीही समोर आली आहे.आता सरकारकडून या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे घेतलं जातं का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.




