शिक्षण सचिवांची बदली, नव्या नियुक्तीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप; अभिजित दिपकेंची सरकारवर टीका
मुंबई (प्रतिनिधी) : जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालयात मोठे प्रशासकीय बदल केले आहेत. उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी नरेश पाल गंगवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, केरळ केडरचे टी. के. अनिल कुमार यांची शालेय शिक्षण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या निर्णयावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काॅकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर जोरदार टीका करत, उत्तरदायित्व निश्चित करण्याऐवजी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप केला आहे.
दिपके यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पेपर लीक आणि NEET वादाच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थेतील पारदर्शकता अपेक्षित असताना, गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती करणे हा देशातील तरुणांचा अपमान असल्याची भावना निर्माण होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी पुन्हा एकदा केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, NEET प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्याऐवजी केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाही. नव्या सचिवांवर यापूर्वीच हॉर्टिकल्चर मिशनमधील अनुदानासंदर्भात आरोप झाले असल्याचा उल्लेख करत त्यांनी या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
रोहित पवार यांनी पुढे असा आरोप केला की, घोटाळ्यांच्या आरोपांनंतरही संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाची पदे देण्याची पद्धत सरकारची कार्यपद्धती बनली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, या आरोपांवर संबंधित अधिकारी किंवा केंद्र सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.




