उद्योजकांसाठी नाही तर उद्योगमंत्र्यांसाठी पायघड्या! चाकण MIDC मध्ये रात्रीच्या अंधारात खड्डे बुजवण्याची प्रशासकीय 'कसरत'

उद्योजकांसाठी नाही तर उद्योगमंत्र्यांसाठी पायघड्या! चाकण MIDC मध्ये रात्रीच्या अंधारात खड्डे बुजवण्याची प्रशासकीय 'कसरत'

पुणे (प्रतिनिधी): शासकीय उदासीनतेला कंटाळून चाकण एमआयडीसीतील (Chakan MIDC) तब्बल ४० उद्योजकांनी स्थलांतराचा पवित्रा घेतल्यानंतर निर्माण झालेल्या तीव्र असंतोषाच्या पार्श्वभूमीवर, अखेर प्रशासन जागे झाले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत रविवारी चाकण दौऱ्यावर येत असल्याने, उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी नव्हे, तर मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी प्रशासनाने शनिवारी रात्रीच्या अंधारात खड्डे बुजवून रस्ते दुरुस्तीची तातडीची कसरत सुरू केली.

चाकण एमआयडीसीतील ४० पैकी २० कंपन्यांनी सातारा जिल्ह्यातील खंडाळा एमआयडीसीमध्ये जाण्याचा निर्धार केला आहे. यामुळे सुमारे १ हजार कोटींचा फटका बसणार असून ४ हजार कामगार बेरोजगार होण्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे. ९० च्या दशकात जागतिक दर्जाच्या ऑटोमोबाईल कंपन्यांमुळे नावारूपाला आलेल्या या औद्योगिक क्षेत्राला निकृष्ट रस्ते, अभूतपूर्व वाहतूक कोंडी, खड्डे, वीज आणि पाण्याच्या तुटवड्यामुळे उतरती कळा लागली आहे.

तक्रारी आणि आंदोलने करूनही ढिम्म राहिलेले प्रशासन, उद्योजकांनी पत्रकार परिषद घेऊन स्थलांतराची घोषणा करताच हडबडून जागे झाले. उद्योगमंत्री उदय सामंत रविवारी दुपारी ४ वाजता उद्योजकांशी चर्चा करण्यासाठी चाकणमध्ये येत असल्याने शनिवारी रात्रीपासूनच रस्त्यांवरील खड्डे मुरूम टाकून बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. मात्र, पावसात या मुरुमामुळे चिखल होऊन अपघात वाढण्याची भीती व्यक्त होत असून, "प्रशासन उद्योगांसाठी काम करते की केवळ मंत्र्यांच्या दिखाव्यासाठी?" असा संतप्त सवाल 'दीक्षा एक्स्पोर्ट्स'चे धनंजय शेडबाळे, केशव कुलकर्णी आणि लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष शंतनू कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.