‘संकटात विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहणं आपलं कर्तव्य’; झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचं मुख्यमंत्र्यांना पत्र

‘संकटात विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहणं आपलं कर्तव्य’; झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई (प्रतिनिधी) : झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे. भरती परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला असून, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

भरती परीक्षांमधील अनियमितता दूर करण्याच्या मागणीसाठी झारखंडमधील विद्यार्थी गेल्या 24 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये चर्चाही झाली आहे. मात्र, अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. काही विद्यार्थी अजूनही उपोषणावर आहेत.

राहुल गांधी यांनी पत्रात राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीमार्फत विद्यार्थ्यांशी संवाद सुरू केल्याबद्दल कौतुक केलं आहे. विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्यांवर सहमती झाल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. मात्र, मागण्यांवर चर्चा होऊनही आंदोलन सुरूच असून काही विद्यार्थी बेमुदत उपोषणावर बसले आहेत.

विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी स्वतः आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी प्रत्यक्ष भेट घ्यावी, असं राहुल गांधी यांनी पत्रात म्हटलं आहे. भारतातील तरुण हेच देशाचं भविष्य आहेत. त्यामुळे या संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन या समस्येवर योग्य ती कारवाई करावी, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी पत्रात पुढे म्हटलं आहे की, भारतीय संविधानाने दिलेला शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. गेल्या काही महिन्यांत पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेतील अनियमिततेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना काँग्रेसने पूर्ण पाठिंबा दिला आहे.

भारतीय शिक्षण व्यवस्थेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपचं नियंत्रण आलं असून, विद्यार्थ्यांच्या शोषणासाठी आणि दडपशाहीसाठी तिचा वापर केला जात आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्था पूर्वीसारखी सक्षम राहिलेली नाही, असा आरोपही राहुल गांधी यांनी पत्रातून केला आहे.झारखंडमधील विद्यार्थीही राज्यातील भरती परीक्षांमधील गैरप्रकारांविरोधात आंदोलन करत आहेत. हे आंदोलन शांततापूर्ण असून विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त आहेत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.