अंबादास दानवेंचा मोठा राजकीय डाव? मविआला धक्का देत महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक
मुंबई (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीऐवजी महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशी दोन प्रमुख पॅनल तयार झाली आहेत. मात्र, ठाकरे गटाचे प्रमुख नेते असलेले अंबादास दानवे यांनी मविआच्या पॅनलपासून दूर राहून महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.विशेष म्हणजे, अलीकडेच ठाकरे गटातील काही नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर दानवे यांच्या या भूमिकेकडे अधिक उत्सुकतेने पाहिले जात आहे. मात्र, या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देताना दानवे यांनी "जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पक्षीय राजकारण नसते" अशी भूमिका मांडली आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या 21 संचालकपदांसाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी 83 उमेदवारांनी माघार घेतली असून 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आता उर्वरित 12 जागांसाठी 31 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.या निवडणुकीत अतुल सावे, कल्याण काळे,अनुराधा चव्हाण आणि अंबादास दानवे यांच्यासह अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
अंबादास दानवे यांचा हा निर्णय केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित आहे की भविष्यातील मोठ्या राजकीय समीकरणांची नांदी आहे, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल अनेक राजकीय प्रश्नांची उत्तरे देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




