साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणाचा निकाल; आरोपी भीमराव कांबळे दोषी
पुणे (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या साडेतीन वर्षांच्या बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात आज महत्त्वाचा निकाल लागला आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

महाराष्ट्र दिनी घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. गुन्हा घडल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास पथकाच्या माध्यमातून वेगाने तपास पूर्ण करत अवघ्या 15 दिवसांत 1200 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात या खटल्याची दैनंदिन सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय आणि न्यायवैद्यकीय अहवाल, डीएनए पुरावे तसेच प्रत्यक्षदर्शींच्या साक्षींचा आधार घेण्यात आला.
निकाल जाहीर करताना न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवले. शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायाधीशांनी आरोपीला त्याचे म्हणणे मांडण्याची संधी दिली. मात्र आरोपीने पुन्हा एकदा आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावर न्यायालयाने गुन्हा सिद्ध झाल्याचे स्पष्ट करत शिक्षेबाबत विचारणा केली. मात्र आरोपीकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही.आता या प्रकरणात न्यायालयाकडून आरोपीला नेमकी कोणती शिक्षा सुनावली जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




