नाशिककरांनो सावधान! गोदावरी धोक्याच्या उंबरठ्यावर; संध्याकाळनंतर पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता
मुंबई (प्रतिनिधी) : नाशिक शहर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील सर्वात मोठा पूर आला आहे. रामकुंड परिसरातील अनेक मंदिरे आणि रामसेतू पूल पाण्याखाली गेले असून, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे.

गंगापूर धरण सध्या 97 टक्के भरले असून, कश्यपी आणि गौतमी गोदावरी धरणांतून येणाऱ्या पाण्यामुळे धरणातून 13 हजार क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. पावसाचे पाणी आणि धरणातील विसर्ग मिळून होळकर पुलाखालून सुमारे 24 हजार क्यूसेक पाण्याचा प्रवाह जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेषतः सराफ बाजार, भांडी बाजार आणि नदीलगतच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, त्र्यंबकेश्वरमध्ये गेल्या 24 तासांत 194 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांची पत्रेही उडाली. सुरगाणा तालुक्यात नाल्यात पाय घसरून पडल्याने 42 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर गुजरातमधील वलसाड येथे पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
सध्या दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी करू नये, नदीकाठच्या धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




