मोशी दुर्घटना: फक्त तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला? नातेवाईकांचा प्रशासनाला घेराव
मुंबई (प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवडच्या मोशी येथे झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर बचावकार्य अजूनही सुरू आहे. तब्बल 67 तास उलटल्यानंतरही शोधमोहीम संपलेली नाही. दुर्घटनाग्रस्त इमारतीचा अस्थिर भाग हटवण्यासाठी अत्याधुनिक डिमॉलिशन एस्कव्हेटर मशीन तैनात करण्यात आलं आहे. या मशीनच्या मदतीने इमारतीचा धोकादायक भाग स्थिर करण्यासह आत सुरक्षित प्रवेशासाठी नवीन मार्ग तयार केला जात आहे. दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडण्यात आला असून आता पहिल्या मजल्यावरील स्लॅब हटवण्याचे काम सुरू आहे. या स्लॅबखाली आठ कामगार अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात असून आज शोधकार्य पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, मोशी दुर्घटनेतील इमारतीच्या फक्त तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला होता, असा धक्कादायक खुलासा एबीपी माझाने केला. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. "मी आधीच या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याला पूर्णत्वाचा दाखला होता की नव्हता, हे चौकशीत स्पष्ट होईल," असं म्हणत त्यांनी अधिक भाष्य करण्यास टाळलं.
दुसरीकडे, दुर्घटनेत अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी रात्री उशिरा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांना घेराव घालत संतप्त सवाल केले. "आम्हाला उत्तर हवं आहे. दगा-फटका झाला असेल तर त्याची भरपाईही झाली पाहिजे. मंत्री, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी आले, पण त्यानंतर आम्हाला कुणीही स्पष्ट माहिती दिली नाही. या घटनेची जबाबदारी नेमकी कोण घेणार?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
नातेवाईकांनी आपल्या वेदना व्यक्त करत सांगितलं की, "आमचा नातेवाईक अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी कामावर लागला होता. नुकतंच त्याचं लग्न झालं होतं. अक्षय गायकवाडला लहान मुलं आहेत. जबाबदार अधिकारी आमच्यासमोर का येत नाहीत? आम्ही न्यायासाठी कोणाकडे जायचं? आमच्यासोबत चला आणि आमच्या नातेवाईकांना दिलासा द्या."
ही भीषण दुर्घटना 8 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजता मोशी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात घडली. मुसळधार पावसामुळे 'लेगसी वेस्ट'चा प्रचंड ढिगारा घसरून तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला. या दुर्घटनेत अनेक कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले. त्यानंतर NDRF, अग्निशमन दल, लष्कर आणि इतर आपत्कालीन यंत्रणांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केलं.
दुर्घटनेत इमारतीचा मोठा भाग कोसळल्याने अनेक कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले. काहींना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं असलं तरी काही कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत. विषारी वायू, अस्थिर इमारत आणि सततचा पाऊस यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. या घटनेनंतर कचरा व्यवस्थापन, सुरक्षा उपाययोजना आणि प्रशासकीय निष्काळजीपणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.




