भाजप की ठाकरे? एकनाथ खडसेंच्या 'मातोश्री' भेटीमागचं खरं कारण अखेर समोर

भाजप की ठाकरे? एकनाथ खडसेंच्या 'मातोश्री' भेटीमागचं खरं कारण अखेर समोर

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा एकनाथ खडसे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी खडसेंची भेट घेतल्यानंतर त्यांच्या भाजपमध्ये पुनरागमनाच्या चर्चांना वेग आला होता. त्याचदरम्यान खडसे यांनी थेट 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने नव्या राजकीय चर्चांना उधाण आले.

या भेटीत खासदार संजय राऊतही उपस्थित असल्याने अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली. खडसे ठाकरे गटात जाणार का, की भाजपमध्ये घरवापसी करणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला.

मात्र, एकनाथ खडसे यांनी या भेटीमागील कारण स्पष्ट केले. पुढील महिन्यात होणाऱ्या त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी ते कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांना भेटल्याचे त्यांनी सांगितले. ही केवळ सदिच्छा भेट असून तिचा कोणत्याही पक्षप्रवेश किंवा राजकीय समीकरणांशी संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भाजपमध्ये पुनरागमनाच्या चर्चाही सुरूच आहेत. मात्र, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार असलेल्या खडसे यांनी तातडीने पक्ष बदलण्याची शक्यता कमी असल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे.आता खडसेंच्या पुढील राजकीय भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, येत्या काही दिवसांत या चर्चांना नवे वळण मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.