एसआरए सेवा थेट झोपडीधारकांच्या दारात; बोरीवलीत ५००हून अधिक प्रकरणे निकाली

एसआरए सेवा थेट झोपडीधारकांच्या दारात; बोरीवलीत ५००हून अधिक प्रकरणे निकाली

मुंबई (प्रतिनिधी) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातर्फे बोरीवली पूर्वेकडील कुलुपवाडी येथील गोरक्षधाम हॉल येथे आयोजित शिबिरात झोपडीधारकांचे विविध प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात आले. या शिबिराला प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच ५०० हून अधिक झोपडीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेंतर्गत मुंबईत समस्या निराकरण शिबिरांचे आयोजन केले जात आहे.

‘एसआरए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकाराने आणि मागाठाणे विधानसभेचे आ. प्रकाश सुर्वे यांच्या सहकार्याने शिबिर घेण्यात आले. यावेळी पात्र लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या, वारसपत्रे तसेच भाड्याचे धनादेश देण्यात आले. प्रशासनातील अधिकारी वस्त्यांमध्ये येऊन समस्या ऐकत असल्याने झोपडीधारकांनी समाधान व्यक्त केले. 

प्रशासन नागरिकांच्या दारी पोहोचावे, झोपडीधारकांच्या समस्या जलदगतीने मार्गी लागाव्यात आणि प्रत्येक पात्र नागरिकाला न्याय मिळावा, या उद्देशाने ‘एसआरए’तर्फे मुंबईतील विविध भागांमध्ये समस्या निराकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांनी या शिबिरांमध्ये आपल्या समस्या मांडाव्यात.