26/11 हल्ल्यावेळी गिरीश महाजन बंदूक घेऊन रस्त्यावर उतरले होते? एकनाथ खडसेंनी दावा फेटाळला
मुंबई (प्रतिनिधी) : 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी बंदूक घेऊन दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी रस्त्यावर उतरलो होतो, मात्र एकनाथ खडसेंनी मला काळजीपोटी रोखलं, असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता. मात्र या दाव्याला आता स्वतः एकनाथ खडसे यांनी ठामपणे फेटाळून लावलं आहे.खडसे म्हणाले, "माझी स्मृती व्यवस्थित असेल तर त्या काळात माझी आणि गिरीश महाजन यांची कोणतीही भेट झालेली नव्हती. त्यामुळे त्यांनी बंदूक घेऊन रस्त्यावर उतरण्याचा प्रसंग मला तरी आठवत नाही."

याबाबत अधिक माहिती देताना खडसे यांनी सांगितलं की, 26 नोव्हेंबर 2008 रोजी ते नंदुरबार जिल्ह्यातील एका दुर्गम गावात होते. तिथे टीव्ही किंवा इतर माध्यमांची सुविधा नव्हती. नंतर जयकुमार रावल यांच्या गावी पोहोचल्यानंतर त्यांना हल्ल्याची माहिती मिळाली. त्याचवेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा वायरलेसवरून तातडीने मुंबईला येण्याचा संदेश आला.
खडसेंच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे वाहन नसल्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथे एक छोटे विमान पाठवण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी ते मुंबईतील बैठकीसाठी रवाना झाले. त्यामुळे त्या काळात गिरीश महाजन यांच्याशी कोणतीही भेट किंवा चर्चा झाल्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनीही राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. अलीकडेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या भेटीनंतर या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. मात्र, या सर्व चर्चांदरम्यान 26/11 संदर्भातील महाजन-खडसे यांच्यातील दाव्यांवरून नवा राजकीय वाद रंगताना दिसत आहे.




