उद्योगपतींचे 20 लाख कोटींचे कर्ज माफ झाले, मग शेतकरी कर्जमाफीने बँका कशा अडचणीत?; रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

उद्योगपतींचे 20 लाख कोटींचे कर्ज माफ झाले, मग शेतकरी कर्जमाफीने बँका कशा अडचणीत?; रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

पंढरपूर (प्रतिनिधी) : उद्योगपतींची तब्बल 20 लाख कोटी रुपयांची कर्जे माफ करण्यात आली, तेव्हा बँकिंग व्यवस्था अडचणीत आली नव्हती. मग शेतकऱ्यांच्या अवघ्या 35 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीमुळे बँका अडचणीत कशा येतील? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी रोहित पवार यांनी पंढरपुरात सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी 2019 मधील कर्जमाफीवरील अटी हटवल्यास बँकिंग व्यवस्था अडचणीत येऊ शकते, असे वक्तव्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

"देशाची आर्थिक स्थिती इतकी मजबूत आहे की देशावरील संपूर्ण कर्ज एका दिवसात फेडता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. मात्र, 2014 मध्ये देशावर 56 लाख कोटी रुपयांचे कर्ज होते, ते मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळात 210 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. सरकारला जर एवढे मोठे कर्ज फेडण्याची क्षमता असेल, तर आम्ही ते करण्याची मागणी करत नाही. पण राज्यातील 55 लाख शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी सर्व जाचक अटी हटवून लागू करावी," अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांना टोला लगावत रोहित पवार म्हणाले, "आमच्याशी चर्चेसाठी अभ्यासू नेता पाठवा. सांगलीचा नेता किंवा पालकमंत्री पाठवू नका. त्यांचा अभ्यास किती आहे, याची आम्हाला चांगली कल्पना आहे."दरम्यान, अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी नेते अजित नवले यांनी रोहित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवर सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.