नृसिंहवाडीत कृष्णा नदीचे पाणी मंदिरात; पुराच्या पाण्यातूनच भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन, गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. या मुसळधार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात कृष्णा नदीचे पाणी शिरले आहे. मंदिर परिसरात पाणी आले असूनही, बुधवारी गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर श्री दत्त महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात भव्य उत्सव साजरा केला जातो. यावर्षी देखील मंदिराच्या चरणांना आणि परिसरात कृष्णा मातेच्या पाण्याचा स्पर्श झाला असतानाच, भाविकांनी या पवित्र जलातून मार्ग काढत श्रद्धेने श्रींचे दर्शन घेतले.
पावसाचा जोर आणि नदीची वाढती पातळी लक्षात घेता प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. तरीही भाविकांच्या उत्साहात आणि श्रद्धेत कोणतीही कमतरता दिसून आली नाही. पुराच्या पाण्यातून मार्ग काढत दत्तभक्तांनी श्री गुरुदेवांचा जयघोष करत गुरुपौर्णिमेचा उत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा केला.




