मनोज जरांगेंनी महिला आंदोलकांना सांगितला मास्टरप्लॅन; म्हणाले, 'मुंबईत शिंदे-फडणवीसांचं घर गाठा, अमृताताई-लताताईंना हळदी-कुंकू लावा'
मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाचं अस्त्र उगारलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषणाच्या 15 व्या दिवशी मुंबईला जाण्याची घोषणा केली. 20 सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर पुढील उपोषणाचा लढा सुरू ठेवण्याचा निर्धारही मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या आंदोलनाला पाठिंबा देत अंतरवाली सराटी येथे उपस्थित असलेल्या महिला आंदोलकांनी मुंबईला आपल्यासोबत येण्याची मागणी केली. यावर मनोज जरांगे पाटील यांनी महिलांना वेगळाच सल्ला दिला.

आझाद मैदानावर येण्याऐवजी सर्व महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या घरी हळदी-कुंकू घेऊन जावं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. "सर्व महिलांनी अमृताताई आणि लताताई यांच्या घरी हळदी-कुंकू घेऊन जायचं. अमृताताई आणि लताताईंकडे हळदी-कुंकू घेऊन जा आणि लावा," असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
सौभाग्याचं लेणं असलेलं कुंकू घेऊन महिला गेल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी ते स्वीकारणार नसतील तर ते कसले हिंदू? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला. फडणवीसांनी लाडकी दीदी आणि एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण असं म्हणत महिलांना उन्हात उभं करणार नाहीत. दोघांना 25 लाख महिलांना जेवण द्यावं लागेल, असंही जरांगे यांनी म्हटलं.
अमृताताई आणि लताताई यांच्या घरी महिलांनी जायचं. त्या हिंदू असतील तर बाहेर येतील, अन्यथा या घटनेची बातमी जगभर जाईल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. हळदी-कुंकवासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी बाहेर येणार नसतील तर त्यांच्या मनगटाला काय चुना लावायचा का? असा खोचक सवालही त्यांनी केला.
"लाडकी बहीण रट्टे खाऊ शकत नाहीत. दोन्ही भावाकडे मरणाचा माल आहे. वर्षावर राहणाऱ्या भावाचे पैसे दिसत नाहीत, ते खूप चिकट आहेत. दुसऱ्या भावाचा माल जाहीर दिसतो," असं वक्तव्यही मनोज जरांगे यांनी केलं. जी तारीख ठरली आहे, त्या दिवशी मराठ्यांचं वादळ उठेल आणि देशाचा मीडिया ते पाहील, असा दावा त्यांनी केला. या मोहिमेसाठी सर्वांनी सावध राहावं, डोकं वापरून आणि शांततेने आंदोलन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
मुंबईकडे जाताना मराठ्यांना मान खाली घालायला लावू नका, असं म्हणत जरांगे यांनी पोलिसांना आणि गृहमंत्र्यांनाही आवाहन केलं. अंतरवाली सराटीपासून मुंबईपर्यंत जाताना मराठा आंदोलकांना अडवू नये, असं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी अडवल्यास जिथे अडवतील तिथे शांतपणे बसून राहण्याचं आवाहन त्यांनी आंदोलकांना केलं. मात्र, आंदोलनादरम्यान रक्त सांडलं तर 15 मिनिटांत महाराष्ट्र बंद पडला पाहिजे, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे आता 20 सप्टेंबरच्या मुंबई आंदोलनापूर्वी मनोज जरांगे यांच्या या आवाहनानंतर मराठा महिला आंदोलकांची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.




