'अंतरवालीपासून मुंबईपर्यंत कुठेही अडवायचं नाही'; मनोज जरांगेंचा पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना इशारा, म्हणाले- 'जिथं अडवाल तिथं...'
मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषणाच्या 15 व्या दिवशी मुंबईला जाण्याची घोषणा केली. मुंबईकडे जाताना मराठ्यांना मान खाली घालायला लावू नका, असं म्हणत त्यांनी सरकार आणि पोलिसांना आवाहन केलं. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला जाण्याचा मार्गही जाहीर केला. अंतरवाली सराटीपासून मुंबईकडे जाताना पोलिसांनी आणि गृहमंत्र्यांनी मराठा आंदोलकांना अडवू नये, असं आवाहन त्यांनी केलं. पोलिसांनी अडवल्यास जिथे अडवतील तिथे शांततेत बसून राहण्याचं आवाहनही जरांगे यांनी केलं.

मनोज जरांगे यांचा पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे होणार आहे. दुसरा मुक्काम अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे, तर तिसरा मुक्काम पुण्यातील हडपसर येथे होणार आहे. पुण्यातून पुढे कोणत्याही मार्गाने मुंबईला जाता येतं. चौथा मुक्काम रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. खोपोली की कोपरखैरणे याबाबत चर्चा सुरू होती, मात्र खोपोली निश्चित समजा, असं जरांगे यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे.
पाटोदा येथे पहिला मुक्काम असल्याने तिथल्या सर्व मराठा बांधवांनी तयारीला लागावं, असं आवाहन जरांगे यांनी केलं. श्रीगोंदा तालुक्यातील संपूर्ण मराठा समाजाने, तसेच हडपसर आणि पुणे शहरातील मराठा बांधवांनीही तयारीला लागावं, असं त्यांनी सांगितलं. रायगड जिल्ह्यातील आणि नवी मुंबईतील खोपोली व कोपरखैरणे परिसरातील बांधवांनीही कामाला लागावं. पाचव्या दिवशी सकाळी 10 वाजता आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं.
अंतरवाली, शहागड, गेवराई, बीड, मांजरसुभा, लिंबा गणेश मार्गे पाटोदा या मार्गावरून मुंबईकडे जाणारे मराठा बांधव समाजाच्या अस्तित्वासाठी चालले आहेत, असं जरांगे यांनी म्हटलं. या मार्गावरून जे मराठा बांधव मुंबईला येणार नाहीत, त्यांनी रस्त्यावर येऊन आशीर्वाद द्यावा आणि मुंबईकडे जाणाऱ्या आंदोलकांना निरोप द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. समाजासाठी एक दिवस काढून आम्हाला आशीर्वाद द्या आणि त्यानंतर घरी परत जा, असंही ते म्हणाले.
ज्या तारखेला आंदोलनासाठी बोलावलं आहे, त्या दिवशी रस्त्यावर या. काम, नोकरी आणि व्यवसाय बंद ठेवून सहभागी व्हा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. चिखलाने पाय भरले असले तरी शेतातून पळत या आणि मुंबईकडे जाणाऱ्या आपल्या बांधवांना आशीर्वाद देण्यासाठी रस्त्यावर या, असंही त्यांनी सांगितलं. मुंबईत बेमुदत आमरण उपोषण होणार असून, कायमस्वरूपी आंदोलनासाठी आणि रॅलीसाठी येणाऱ्या सर्वांनी एकाच मार्गाने चालायचं आहे. मुंबईकडे येणाऱ्या आंदोलकांनी एकमेकांना ओव्हरटेक करू नये आणि दिलेल्या सूचना विसरू नयेत, असं जरांगे यांनी स्पष्ट केलं.
शांततेच्या मार्गाने मुंबईला जायचं आहे. कोणाला धक्का लागू नये, इजा होऊ नये, याची काळजी घ्यायची आहे. ठरवलेल्या मार्गाने सर्वांनी एकत्र जायचं असून आंदोलन पूर्णपणे शांततेच्या मार्गाने करायचं आहे, असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान, पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना उद्देशून मनोज जरांगे म्हणाले की, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत कुठेही बॅरिकेड लावून आंदोलकांना अडवू नये. आम्हाला लोकशाही मार्गाने आणि शांततेत आमरण उपोषण करायचं आहे. लोकशाहीच्या मार्गाने आमचा हक्क मिळवण्यासाठी हे आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
"मग तुम्ही अडवता कशासाठी? तुम्हाला राज्य अस्थिर करायचं आहे का?" असा सवालही जरांगे यांनी केला. मात्र, पोलिसांनी अडवलं तरी शांततेत बसून राहायचं, रस्त्यावर झोपायचं; बॅरिकेड्स ढकलायचे नाहीत, असं आवाहन त्यांनी आंदोलकांना केलं.




