'दृश्यम' स्टाईलने पतीला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न; गुंगीचं औषध, बॅटने मारहाण, बारामतीतील धक्कादायक घटना
पुणे (प्रतिनिधी) : 'दृश्यम' चित्रपटातील मृतदेह लपवण्याच्या कथानकाची आठवण करून देणारी एक धक्कादायक घटना बारामतीत समोर आली आहे. एका 38 वर्षीय महिलेने आपल्या पतीला गुंगीचं औषध देऊन अर्धबेशुद्ध केलं, त्यानंतर बॅटने मारहाण करत त्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे बारामती शहरात मोठी खळबळ उडाली आहे.ही घटना 30 जुलैच्या रात्रीपासून 1 ऑगस्टच्या सकाळपर्यंत बारामती शहरातील जामदार रोडवरील इंद्रप्रस्थ सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये घडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शर्मिला प्रवीण जगताप (वय 38) हिने पती प्रवीण प्रकाश जगताप यांना ठार मारण्याच्या उद्देशाने गुंगीचं औषध दिलं. ते अर्धबेशुद्ध झाल्यानंतर त्यांना बॅटने मारहाण करण्यात आली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने घरातील गॅलरीत विटा आणि सिमेंटचा चौकोनी कट्टा बांधण्यात आला. प्रवीण जगताप यांना त्या कट्ट्यात झोपवून वरून कडप्पा फरशी बसवून तो पूर्णपणे बंद करण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.
मात्र, हा प्रकार वेळेत उघडकीस आल्याने प्रवीण जगताप यांचा जीव वाचला. याप्रकरणी त्यांचे वडील प्रकाश जगताप यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपी पत्नी शर्मिला जगताप हिच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घरातच पतीला जिवंत पुरण्याचा कट रचल्याच्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.




