AISA अध्यक्षा नेहा बोरांवर आंदोलनादरम्यान शाईफेक; म्हणाल्या, 'अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
मुंबई (प्रतिनिधी) : झारखंडमध्ये 14व्या JPSC परीक्षेच्या रद्दबातलच्या मागणीसाठी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान AISAच्या अध्यक्षा नेहा बोरा यांच्यावर शाईफेक करण्यात आली. विधानसभेला घेराव घालण्यासाठी निघालेल्या मोर्चादरम्यान हा प्रकार घडला. पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतलं असून, तो ABVPशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे.

शाईफेकीनंतर नेहा बोरा म्हणाल्या, आम्ही अश्रुधुरांनाही घाबरलो नाही, मग या शाईने काय होणार? त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा कायम असल्याचं स्पष्ट केलं.
दरम्यान, झारखंडमधील विद्यार्थी 14व्या JPSC परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 14 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. उपोषणावर असलेल्या राहुल क्रांती यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर इतर काही आंदोलक अजूनही उपोषणावर आहेत.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सरकार विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास तयार असल्याचं सांगितलं. मात्र, विद्यार्थी शिष्टमंडळात माजी महाधिवक्त्याचा समावेश करण्यास सरकारने आक्षेप घेतल्यामुळे चर्चा निष्फळ ठरली.
नेहा बोरा यांनी यावेळी परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दाही उपस्थित केला. देशातील प्रत्येक परीक्षा पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे. पेपरफुटीच्या घटनांसाठी केवळ खासगी एजन्सींना नव्हे, तर संबंधित सरकारी अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी 13 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर निर्णय न झाल्यास आंदोलनात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपोषणकर्त्या विद्यार्थी नेत्यांशी दूरध्वनीवर संवाद साधत आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला असून, शिक्षण व्यवस्थेत व्यापक बदल करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.




