उपोषणाला बसलेल्या अभिजीत दीपकेंवर महिलेची शाईफेक; आंदोलनात घुसखोरीचा गंभीर आरोप

उपोषणाला बसलेल्या अभिजीत दीपकेंवर महिलेची शाईफेक; आंदोलनात घुसखोरीचा गंभीर आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळाला आहे. आमरण उपोषणाला बसलेले कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर एका महिलेने शाईफेक केल्याची घटना घडली आहे.शाईफेकीनंतर उपस्थित आंदोलकांनी संबंधित महिलेला पकडलं. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. यावेळी अभिजीत दीपके यांनी गंभीर आरोप करत म्हटलं की, आंदोलन कमकुवत करण्यासाठी बाहेरून लोक पाठवले जात आहेत.

"पाचशे-पाचशे रुपये देऊन गुंडांना आंदोलनात घुसवलं जात आहे," असा आरोप अभिजीत दीपके यांनी केला आहे. मात्र, या आरोपांबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.दरम्यान, जंतर मंतरवर 21 दिवसांपासून उपोषणाला बसलेले पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शनिवारी सकाळी पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी साध्या वेशात येऊन वांगचुक यांना रुग्णालयात नेल्याचा दावा करण्यात आला असून, यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे.

सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. वांगचुक यांना रुग्णालयात नेल्याची माहिती आपल्याला किंवा कुटुंबीयांना देण्यात आली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.त्यांनी सांगितलं की, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत काही चिंता व्यक्त केली असून, पोटॅशियमची पातळी कमी झाल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, वैद्यकीय अहवाल देण्यात आला नसल्याचा आरोप त्यांनी केला.

सोनम वांगचुक सहभागी होऊ शकले नाहीत तरी नियोजित मोर्चा होणार असल्याचं गीतांजली आंगमो यांनी स्पष्ट केलं आहे. "त्यांना रुग्णालयात नेलं म्हणजे आंदोलन थांबणार नाही," अशी भूमिका त्यांनी मांडली.दुसरीकडे, सफदरजंग रुग्णालय प्रशासनाने सांगितलं की, सोनम वांगचुक यांना सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलं. दीर्घकाळ उपवास आणि डिहायड्रेशनमुळे ते अशक्त झाले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, त्यांच्यावर सतत वैद्यकीय देखरेख आणि उपचार सुरू असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.

जंतर मंतरवरील आंदोलन, सोनम वांगचुक यांची प्रकृती आणि अभिजीत दीपके यांच्यावरील शाईफेकीच्या घटनेमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे.