संसद मोर्च्याआधी जंतर-मंतरवर खळबळ! दगडांचा डम्पर, फुटलेली कार; CJP चा पोलिसांवर निशाणा
मुंबई (प्रतिनिधी) : कॉकरोच जनता पार्टी (CJP) आज, 20 जुलै रोजी संसदेकडे मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिलेली नसल्याचे सांगितले जात आहे. तरीही जंतर-मंतर परिसरात मोठ्या संख्येने आंदोलक जमा झाले आहेत.

दरम्यान, जंतर-मंतर परिसरात दगडांनी भरलेला डम्पर आणि काचा फुटलेली एक कार दिसल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. CJP ने यावरून दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत, या वाहनांचा उद्देश काय आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, शांततापूर्ण आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दुसऱ्या पोस्टमध्येही त्यांनी जंतर-मंतरवर आधीच दगडांनी भरलेला ट्रक आणि नादुरुस्त वाहन ठेवण्यात आल्याचा दावा केला. आंदोलन हिंसक असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
अभिजित दीपके यांनी मात्र आपल्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. "आमच्या बाजूने कोणताही अनुचित प्रकार होणार नाही. संसदेकडे जाणारा मोर्चा पूर्णपणे शांततापूर्ण राहील, याची आम्ही काळजी घेऊ," असे ते म्हणाले.
याचवेळी, उपोषणावर असलेले सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडण्यासाठी तीन अटी मांडल्या आहेत. शिक्षण व्यवस्था आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर सरकारने जबाबदारी स्वीकारावी, संसदेत प्रतिनिधींना आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी किंवा प्रकृतीमुळे ते शक्य नसल्यास खासदारांनी रुग्णालयात येऊन आश्वासन द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.




