'नीट'चा गोंधळ कायम! अँसर कीनुसार 700+ गुणांची खात्री, पण निकालात फक्त 87 मार्क्स
मुंबई (प्रतिनिधी) : नीट परीक्षेच्या निकालावरून पुन्हा एकदा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पेपरफुटी, निकालातील गोंधळ आणि पारदर्शकतेवरून देशभरात चर्चा सुरू असतानाच आता बीड जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.

वडवणी येथील ज्ञानेश्वरी पवार हिने डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन नीट परीक्षा दिली होती. वर्षभर अथक मेहनत घेत तिने अभ्यास केला. परीक्षेनंतर तिने स्वतः अँसर की तपासली आणि त्यानुसार तिला 700 पेक्षा जास्त गुण मिळतील, असा विश्वास होता. चांगल्या गुणांच्या जोरावर तिने देशातील प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थेत प्रवेश मिळवण्याचं स्वप्न पाहिलं होतं.
मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर ज्ञानेश्वरीला मोठा धक्का बसला. स्कोअरकार्डवर तिचे केवळ 87 गुण दिसत होते. अपेक्षित गुण आणि प्रत्यक्ष मिळालेले गुण यामध्ये एवढी मोठी तफावत कशी आली, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.निकाल पाहिल्यानंतर ज्ञानेश्वरीला अश्रू अनावर झाले. तिच्या कुटुंबीयांनीही या निकालावर आक्षेप घेतला असून ओएमआर शीटमध्ये काहीतरी गडबड झाल्याचा आरोप केला आहे.
ज्ञानेश्वरीच्या आई मीरा पवार यांनी सांगितलं की, "माझ्या मुलीने वर्षभर प्रचंड मेहनत घेतली. अनेकदा 18-18 तास अभ्यास केला. स्वतःच्या आरोग्याची आणि जेवणाचीही पर्वा न करता तिने फक्त नीटसाठी तयारी केली. त्यामुळे तिला एवढे कमी गुण कसे मिळू शकतात? त्यांनी पुढे ओएमआर शीट दाखवण्याची मागणी केली आहे. "आम्हाला मुलीची ओएमआर शीट लाईव्ह दाखवा. नेमकी चूक कुठे झाली हे स्पष्ट करा," अशी मागणी त्यांनी केली आहे.
ज्ञानेश्वरीच्या कुटुंबाचा आरोप आहे की, अँसर कीनुसार तिचे गुण जास्त येणे अपेक्षित असताना अंतिम निकालात एवढी मोठी घट कशी झाली, याची चौकशी होणे गरजेचे आहे.दरम्यान, नीट परीक्षेतील अनियमिततेवरून आधीच देशभरात वातावरण तापलेले आहे. अशातच ज्ञानेश्वरी पवारच्या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम आणखी वाढला आहे.




