"डीपीच्या मुद्द्यावर खा.ओमराजे निंबाळकरांची व्हायरल ऑडिओ क्लिप; तरुणासोबतच्या संभाषणाची जोरदार चर्चा"

"डीपीच्या मुद्द्यावर खा.ओमराजे निंबाळकरांची व्हायरल ऑडिओ क्लिप; तरुणासोबतच्या संभाषणाची जोरदार चर्चा"

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि एका तरुणामधील फोनवरील संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्रान्सफॉर्मर (डीपी) बसवण्याच्या प्रश्नावर झालेल्या या संवादामुळे राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

व्हायरल होत असलेल्या ऑडिओनुसार, एका तरुण शेतकऱ्याने डीपीच्या समस्येबाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला. "एका डीपीसाठी शेतकऱ्याला ५० ते १०० वेळा चकरा माराव्या लागत असतील, तर हे कसं चालणार?" असा प्रश्न त्या तरुणाने उपस्थित केला.

यावर उत्तर देताना ओमराजे निंबाळकर यांनी विरोधी पक्षात असताना विकासकामे मार्गी लावण्यात येणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला. "आम्ही विरोधात असताना शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर बसवणे किती कठीण होते, हे लोकांना विचारून पाहा. त्या काळात साधी डीपी बसवणेही अवघड होते," असे ते संभाषणात म्हणाल्याचे ऐकायला मिळते.

याच संभाषणादरम्यान, "आम्हाला लाईनमन म्हणून हिनवू नका," असे वक्तव्यही त्यांनी केल्याचे या कथित ऑडिओमध्ये ऐकू येते. या विधानावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून अनेकांनी त्यावर टीका केली आहे, तर काहींनी त्यांच्या भूमिकेचे समर्थनही केले आहे.दरम्यान, या व्हायरल ऑडिओ क्लिपच्या सत्यतेबाबत किंवा ती कोणत्या परिस्थितीत रेकॉर्ड करण्यात आली याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणावर विविध स्तरांतून चर्चा सुरू आहे.