उपोषणाच्या 26व्या दिवशीही सोनम वांगचुक ठाम; डॉक्टरांचा गंभीर इशारा, सरकारसमोर अटी ठेवल्या

उपोषणाच्या 26व्या दिवशीही सोनम वांगचुक ठाम; डॉक्टरांचा गंभीर इशारा, सरकारसमोर अटी ठेवल्या

मुंबई (प्रतिनिधी) : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 26 वा दिवस आहे. सध्या त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, रुग्णालयात दाखल असतानाही त्यांनी आपले उपोषण कायम ठेवले आहे. दरम्यान, सरकारने काही अटी मान्य केल्यास उपोषण मागे घेण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

सरकारला लिहिलेल्या पत्रात वांगचुक यांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई किंवा दंडात्मक पावले उचलली जाणार नाहीत, अशी लेखी हमी मागितली आहे. ही हमी मिळाल्यास उपोषण थांबवण्याचा विचार करू, अन्यथा आंदोलन सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई, नीट पेपरफुटी प्रकरणावर संसदेत चर्चा करून जबाबदारी निश्चित करणे, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर विचार करणे आणि आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करणे, या मागण्यांचा समावेश आहे.

वांगचुक यांच्यावर उपचार करणारे डॉ. नितीन दिघे यांनी सांगितले की, सलग 25 ते 26 दिवस उपोषण सुरू असल्यामुळे त्याचा गंभीर परिणाम शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी वांगचुक यांची भेट घेतल्याने सकारात्मक मार्ग निघण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम आहे.

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत पेपरफुटीच्या सर्व प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाईचा पुनरुच्चार केला. पेपर लीकच्या खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.