हिंदूंना बदनाम करणाऱ्यांचं पुढचं टार्गेट कुंभमेळा; विरोधकांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल

हिंदूंना बदनाम करणाऱ्यांचं पुढचं टार्गेट कुंभमेळा; विरोधकांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल

मुंबई (प्रतिनिधी) : विरोधकांकडे आपल्या विचारसरणीला विरोध करण्याची क्षमता आता संपली आहे. त्यामुळे काही मुद्द्यांवरून ते दंगा करतील आणि हिंदू समाज कसा चुकीचा आहे, हे सांगत बसतील, अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हिंदू धर्माला बदनाम करणाऱ्यांचं पुढचं टार्गेट आता कुंभमेळा आहे, असंही ते म्हणाले. पुण्यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ म्हणजेच सीजेपीवरही टीका केली. सीजेपी ही केवळ छोटीशी संघटना नाही. सीजेपी म्हणजे ‘काँग्रेस जिताओ प्रोग्रॅम’ आहे. या संघटनेत ‘भारत जोडो’मधील 80 संघटना सामील आहेत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.पुण्यातील डीजेच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, डीजेच्या वादात न पडता सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा. सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची क्षमता फक्त पुण्यातच आहे.

विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “आपली विचारसरणी हिंदुत्वाची आहे. हिंदुत्वाला यांनी विरोध केला, राम मंदिराला विरोध केला. पण राम मंदिराला विरोध केल्यामुळे जनतेने यांना घरी बसवलं. आता यांच्या लक्षात आलं की विचारसरणीला विरोध करून फायदा नाही.मग यांनी राम मंदिरातील दानपेटीतील काही प्रमाणात घोटाळा झाला हे सत्य आहे. मात्र सगळं मंदिरच लुटल्याचा आव विरोधकांनी आणला आणि त्यावर नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला. हिंदुत्वाला विरोध करता येत नाही, तर हिंदू कशा चुका करतात, त्यांच्या मंदिरात कशा चुकीच्या गोष्टी होतात, हे सांगत बसतात. यांचं पुढचं टार्गेट हे कुंभमेळा आहे.”

विरोधकांचे पोपट कुंभमेळ्यात भ्रष्टाचार होत असल्याचं बोलत आहेत. पण कुंभमेळ्यात आतापर्यंत जेवढे टेंडर झाले आहेत, त्या कामाचं चार टप्प्यांमध्ये ऑडिट होत आहे. ‘खोटं बोला पण रेटून बोला’, असं विरोधकांचं सुरू आहे, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.आम्ही केवळ रामाचं नाव घेणारे नसून त्यांच्या तत्त्वाप्रमाणे राज्यकारभार चालवणारे आहोत, असंही ते म्हणाले.राहुल गांधी यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महिला आरक्षणाला विरोध करणारे काँग्रेस आणि त्यांचे घटकपक्ष होते. आधी पाठिंबा दिला होता तर आता विरोध का? महिला आरक्षणाचे खरे हत्यारे राहुल गांधी हेच आहेत. महिला आरक्षण कायद्याचा राहुल गांधींनी शिरच्छेद केला.

राहुल गांधी रोज खोटं बोलतील. मात्र आपण सत्य घेऊन जनतेत गेलो तर जनतेला ते माहिती होईल. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने शौचालयं बांधली नव्हती, ती पंतप्रधान मोदींनी बांधली. महिलांची बँक अकाऊंट काढली, ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ची घोषणा देणारे मोदीजी आहेत. महिलांना लखपती दीदी करणारे पंतप्रधान आहेत. ‘झूट की गुंज बंद करो राहुल गांधी.’ मला माझ्या नेत्यावर विश्वास आहे. 2029 ला ते महिला आरक्षण आणतील.”