नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील पुन्हा एकदा चर्चेत..

नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील पुन्हा एकदा चर्चेत..

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात त्यांच्या उपस्थितीनंतर सुरू झालेला वाद आता आणखी तीव्र झाला आहे. काँग्रेससह भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पक्ष आणि जय विदर्भ पार्टीच्या प्रतिनिधींनी विश्वास नांगरे पाटील यांची पोलीस भवन येथे भेट घेत त्यांना भारतीय संविधानाची प्रत भेट दिली.

यावेळी विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त म्हणून संविधानाच्या चौकटीत निष्पक्षपणे काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी, "संघ समजून घ्यायचा असेल तर आम्ही अधिक चांगली माहिती देऊ शकतो," अशी प्रतिक्रिया दिली. तसेच, संघ नांगरे पाटील यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही करण्यात आला.

दुसरीकडे, विश्वास नांगरे पाटील यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, RSS च्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी कोणत्याही सेवा नियमांचे उल्लंघन केलेले नाही. त्यांच्या मते, त्या कार्यक्रमातील उपस्थिती ही त्यांच्या शासकीय कर्तव्यांच्या विरोधात नव्हती.दरम्यान, संविधानाची प्रत भेट देण्याच्या या कृतीमुळे नागपूरच्या राजकीय वातावरणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.